भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याची व्याप्ती वाढली

- यावर्षी अमेरिकेकडून तीन अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीच्या शस्त्रांची खरेदी

वॉशिंग्टन – चीनकडून एलएसीवर सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर भारताने संरक्षणसिद्धता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रखरेदी केल्याचे समोर आले आहे. यावर्षी भारताने अमेरिकेकडून तब्बल 3.4 अब्ज डॉलर्सची शस्त्रे खरेदी केल्याची माहिती अमेरिकी यंत्रणेकडून देण्यात आली. ही शस्त्रखरेदी भारत व अमेरिकेमधील वाढत्या संरक्षणसहकार्याचे संकेत असल्याचे मानले जाते.

संरक्षण सहकार्य

यावर्षी भारताने अमेरिकेकडील शस्त्रास्त्र खरेदी मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने (डीएसीए) गेल्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यावर्षी भारताच्या अमेरिकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याची नोंद केली. पुढच्या काळातही भारत अमेरिकेकडून टेहळणी तसेच हल्ला चढविणारे ड्रोन्स खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उभय देशांमधील हे संरक्षणविषयक सहकार्य अधिक उंचीवर जाणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर, भारताचे अमेरिकेबरोबरील संबंध घसरणीला लागतील का, याची चर्चा सुरू झाली होती. पण भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या धोरणात भारताला महत्त्वाचे स्थान असेल असे जाहीर करून या शक्यतांना पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राबाबतच्या धोरणाचा विचार करता, हा देश भारताबरोबरील संबंध दुर्लक्षित करण्याची चूक कधीही करणार नाही, असा निर्वाळा विश्‍लेषक देत आहेत.

अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्या भारताकडे महत्त्वाचा ग्राहक देश म्हणून पाहत आहेत. या कंपन्या भारतातच शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची निर्मिती करणारे संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक असल्याचे उघड झाले आहे. अशा परिस्थितीत भारताचे अमेरिकेबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य अधिकच व्यापक होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. त्याचवेळी ‘लिमोआ’, ‘बेका’ या उभय देशांमध्ये पार पडलेल्या सामरिक सहकार्य कराराचा प्रभाव लवकरच दिसेल, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply