भारत-अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये ‘क्‍वाड’वर चर्चा

नवी दिल्ली – चीनबरोबर तणाव विकोपाला गेला असताना अमेरिकेसह भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या सहभाग असलेल्या ‘क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ची (क्‍वाड) बैठक लवकरच होईल, असे संकेत मिळत आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यामध्ये गुरुवारी रात्री फोनवरून चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांमध्ये इतर मुद्यांसह ‘क्‍वाड’च्या भविष्यातील बैठकीवरही चर्चा झाल्याची माहिती, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. दोन्ही देशांच्या चर्चेत ‘क्‍वाड’चा उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरतो. कारण ‘क्‍वाड’ देश एकत्र आले, तर चीनवर सहज लगाम लावता येईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रीय मंत्री पॉम्पिओ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये दीर्घ व विस्तृत चर्चा झाली. कोरोनाच्या साथीबाबत सहकार्यापासून दक्षिण आशिया, अफगाणिस्तान आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हाने आणि सहकार्यावर चर्चा झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ट्विट करून सांगितले. यामध्ये ‘क्‍वाड’च्या भविष्यतील बैठकीवरही चर्चा केल्याची माहितीही एस. जयशंकर यांनी दिली. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी भारत आणि अमेरिकेच्या मजबूत होणाऱ्या द्विपक्षीय संबंधाना अधोरेखित करताना सर्व देशांना भरभराटीची समान संधी असलेल्या सुरक्षित आणि सार्वभौम ‘इंडो-पॅसिफिक’साठी आम्ही एकत्र आहोत, असे म्हटले आहे.

भारत-अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये 'क्‍वाड'वर चर्चाअमेरिकेच्या परराष्ट्र विभागांच्या प्रवक्त्यांकडूनही या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबाबत माहिती जाहीर करण्यात आली. क्षेत्रीय आणि अंतरराष्ट्रीय मुद्दयांवर सहकार्याबरोबर ‘क्‍वाड’ आणि दोन्ही देशांमधील ‘टू प्लस टू’ चर्चेबद्दलही दोन्ही नेत्यांनी फोनवरून संवाद साधल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. गलवानमधील चीनच्या विश्वासघातानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये सातत्याने फोनवरून संपर्क सुरु आहे. २२ जुलै रोजीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये चर्चा झाली होती. यातून भारत आणि अमेरिकेमधील सहकार्य अधिकाधिक व्यापक बनल्याचे स्पष्ट दिसून येते.

सध्या चीनविरोधात अमेरिकेने मोठी आघाडी उघडली आहे. एकामागोमाग एक आक्रमक निर्णय अमेरिका घेत आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने उघड संघर्षाचे धोरण स्वीकारले आहे. साऊथ चायना सी क्षेत्रात आपल्या युद्धनौकांची तैनाती व गस्त वाढवून अमेरिकेने चीनवरील दडपण वाढविले आहे. चीनचा सीमावाद असलेल्या सर्वच देशांना आपले उघड सहकार्य जाहीर करून अमेरिकेने चीनविरोधात रणशिंग फुंकले आहे. गलवानमधील संघर्षांनंतर भारतही चीनविरोधात आक्रमक झाला असून चीनला एकापाठोपाठ एक आर्थिक दणके देत आहे. तसेच सीमेवर आणि हिंदी महासागर क्षेत्रात तैनाती वाढवून भारताने चीनला योग्य तो संदेश दिला आहे. आता ‘क्‍वाड’च्या उल्लेखातून भारताने चीनला आणखी इशारा दिल्याचे दिसून येत आहे.

चीनविरोधात ‘क्‍वाड’ देशांनी मोर्चेबांधणी करायला हवी. भारताने यामध्ये अधिक सक्रिय भूमिका पार पडायला हवी, असे विश्लेषकांकडून सांगण्यात येते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या माजी उपमंत्री एलिस वेल्स यांनीही भारताला असे आवाहन केले होते. ‘क्‍वाड’ देशांच्या सहकार्याला चीनचा विरोध असून भारताने आपले अलिप्ततावादी धोरण सोडू नये, असे चीनचे म्हणणे आहे. कारण चीनला या आघाडीची प्रचंड धास्ती वाटत असल्याचा विश्लेषकांचा दावा आहे. भारत या आघाडीत सामील असला, भारताने आतापर्यंत यामध्ये मोठी सक्रियता दाखविली नव्हती. चीनविरोधात भारताने उघड भूमिका घेण्याचे टाळले होते. भारत-अमेरिका आणि जपानमध्ये होणाऱ्या ‘मलाबार’ युद्धसरातही ऑस्ट्रेलियाला सहभागी करून याला ‘क्‍वाड’चे स्वरूप देण्यास भारत यासाठीच टाळत आल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मात्र आता भारताच्या या भूमिकेत बदल होताना दिसत आहे. ‘मलाबार’मध्ये ऑस्ट्रेलियाला सहभागी करून घेण्याचे जवळ जवळ निश्चित झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारताने साऊथ चायना क्षेत्र कोणा एकाचे नसल्याची घेतलेली भूमिका, हिंदी महासागर क्षेत्रात अगदी मलाक्काच्या सामुद्रधुनीनजीक जपान आणि नंतर अमेरिकेबरोबर केलेला युद्धसराव यातून भारत चीनला संदेश देत आहे. त्यामुळे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यामध्ये ‘क्‍वाड’च्या बैठकीबाबत झालेली चर्चा अतिशय महत्वाची आणि ‘क्‍वाड’मध्ये भारत अधिक सक्रिय होत असल्याचे संकेत देणारी ठरते, असा विश्लेषकांचा दावा आहे.

leave a reply