‘आयएनएस कवरत्ती’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

विशाखापट्टणम – गुरुवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस कवरत्ती’ ही पाणबुडीविरोधी स्टेल्थ युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द केली. विशाखापट्टणमच्या नेव्हल डॉकयार्ड येथे हा सोहळा पार पडला. ‘आयएनएस कवरत्ती’चा नौदलातला समावेश देशाचे सागरी क्षेत्र सुरक्षित राहण्याच्या हेतूने महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, असा विश्वास जनरल नरवणे यांनी व्यक्त केला. तसेच बलाढ्य भारतीय नौदल नेहमीच सागरी सीमा, प्रदेश आणि विशेष सागरी क्षेत्रांचे संरक्षण करण्यास समर्थ असल्याचा संदेश जनरल नरवणे यांनी यावेळी दिला.

'आयएनएस कवरत्ती' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखलभारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट २८’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या कामॊत्रा श्रेणीतील चार युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘आयएनएस कवरत्ती’ ही या प्रोजेक्टमधली चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे. याआधी ‘आयएनएस कामॊत्रा’, ‘आयएनएस कदमत्त, आयएनएस किलतान’ या युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत. या श्रेणीतील पहिली युद्धनौका २०१४ साली भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती.

‘आयएनएस कवरत्ती’ हे नामकरण १९७१ सालच्या बांगलादेश युद्धात सहभागी झालेल्या अर्नाला श्रेणीतील जुन्या ‘आयएनएस कवरत्ती’ वरुन करण्यात आले आहे. ही युद्धनौका ३३३० टन इतक्या वजनाची असून १०९ मीटर लांब आहे. कोलकाताच्या ‘गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स’मध्ये या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली. ९० टक्के स्वदेशी बनावटीची असून त्यासाठी कार्बन कंपोझिटचा वापर करण्यात आला. तसेच पाणबुडीविरोधी युद्धात वापरण्यात येणारी हेलिकॅप्टर्ससुद्धा ही युद्धनौका वाहून नेऊ शकते.

'आयएनएस कवरत्ती' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल‘आयएनएस कवरत्ती’च्या सागरी चाचण्या पूर्ण झाल्या असून आता ती आव्हानांचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. शत्रूच्या रडारला गुंगारा देणारी ही युद्धनौका आहे. शिवाय ‘आयएनएस कवरत्ती’ मधील सेंसर्समुळे दुरूनही शत्रूच्या पाणबुडीचे ठिकाण शोधून त्याचा माग काढता येईल. तसेच ही युद्धनौका आण्विक, रासायनिक आणि जैविक युद्धात शक्तिशाली ठरेल, असा दावा केला जातो. भारत- चीन आणि भारत- पाकिस्तान या दोन्ही सीमांवर तणाव सुरु आहे. या दोन्ही आघाडींवर लढण्यास भारतीय संरक्षणदल सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएनएस कवरत्ती’चा भारतीय नौदलातला समावेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

leave a reply