कोरोनाची अखेर होण्याऐवजी जग त्यापासून अधिकच दूर चालले आहे

- जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा

जीनिव्हा/वॉशिंग्टन – ‘कोरोनाच्या साथीची अखेर होण्याच्या क्षणापासून जग अधिकाधिक दूर होत चालले आहे. सध्या आपण अत्यंत वाईट परिस्थितीत आहोत आणि संपूर्ण जगाला या वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे’, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेत (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) साथीच्या रोगांच्या विशेषज्ञ असणर्‍या डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी दिला. केर्खोव्ह यांच्या या इशार्‍याला इतर तज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळत आहे. अमेरिकेतील वैद्यक तज्ज्ञ व ‘एफडीए’चे माजी प्रमुख डॉक्टर स्कॉट गॉटिलेब यांनी देश ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या वाढत्या प्रसाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बजावले आहे. ब्रिटीश सरकारने घेतलेल्या ‘अनलॉक’च्या निर्णयावरही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आक्षेप घेतले असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन जगाचे आरोग्य धोक्यात घालीत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

कोरोनाची अखेर होण्याऐवजी जग त्यापासून अधिकच दूर चालले आहे - जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा2019 सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला असून अजूनही त्याचा फैलाव वेगाने चालू आहे. जगभरात सुमारे 19 कोटी कोरोना रुग्ण आढळले असून बळींची संख्या 40 लाखांवर गेली आहे. जगातील अनेक प्रमुख देशांमध्ये साथीची दुसरी व तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाव्हायरसचे नवे ‘स्ट्रेन’ विकसित होत असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात सध्या कोरोना साथीच्या विरोधात पाचहून अधिक लसी उपलब्ध असून अजूनही नव्या लसी विकसित होत आहेत. लसीकरण हा कोरोनाच्या साथीविरोधातील प्रभावी उपाय ठरल्याचे काही देशांमधील घटनांमधून समोर आले आहे. जगातील प्रमुख संघटना व अनेक देशांमधील तज्ज्ञही लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत आग्रही भूमिका घेत आहेत. लसीकरणाचा वेग वाढविलेल्या देशांनी ‘अनलॉक’च्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याचवेळी कोरोनाचे नवे घातक ‘व्हेरिअंट्स’ समोर येत असून त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे.कोरोनाची अखेर होण्याऐवजी जग त्यापासून अधिकच दूर चालले आहे - जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशारा

या पार्श्‍वभूमीवर, डॉ. मारिआ व्हॅन केर्खोव्ह यांनी दिलेला इशारा चिंता वाढविणारा ठरला आहे. त्यांच्या इशार्‍याला अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’चे संचालक फ्रान्सिस कॉलिन्स यांनीही दुजोरा दिला आहे. कोरोनाचे सध्या वाढणारे रुग्ण म्हणजे गेल्या वर्षी पाहिलेला चित्रपट पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आहे आणि त्याचा शेवटही चांगला दिसत नाही, अशा शब्दात कॉलिन्स यांनी विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली.

कोरोनाची अखेर होण्याऐवजी जग त्यापासून अधिकच दूर चालले आहे - जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचा इशाराअमेरिकेतील ‘एफडीए’चे माजी प्रमुख डॉक्टर स्कॉट गॉटिलेब यांनीही देशातील वाढत्या फैलावाकडे लक्ष वेधले असून, त्यामागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ असल्याचे म्हंटले आहे. अमेरिकेतील जनता ‘डेल्टा व्हेरिअंट’च्या वाढत्या प्रसाराकडे दुर्लक्ष करीत आहे, पण हा प्रकार सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे याची जाणीव असायला हवी, असे गॉटिलेब यांनी सांगितले. अमेरिकेत अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत रुग्णांची संख्या 70 टक्क्यांनी वाढली असून, बळींची संख्या 26 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’च कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

नव्या ‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे अमेरिकेबरोबरच ब्रिटन, रशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रलिया यासारख्या प्रमुख देशांमध्ये तसेच आफ्रिका खंडात रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

leave a reply