पीओके भारताचा अविभाज्य भूभाग एक दिवस संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात असेल

- एअर मार्शल अमित देव

श्रीनगर – जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या भावनाही संपूर्ण काश्मीर आणि संपूर्ण देश एक असल्याच्या आहेत. या घडीला पीओके ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही. मात्र एक दिवस पीओके भारताच्या ताब्यात असेल, असे वायुसेनेच्या पश्‍चिम कमांडचे प्रमुख एअर मार्शल अमित देव यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलयानंतर भारतीय लष्कराचे जवान पहिल्यांदा उतरले, त्याला २७ ऑक्टोबर रोजी ७५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात एअर मार्शल अमित देव यांनी हे सूचक विधान केले आहे.

पीओके भारताचा अविभाज्य भूभाग एक दिवस संपूर्ण काश्मीर भारताच्या ताब्यात असेल - एअर मार्शल अमित देव२७ ऑक्टोबर १९४७ साली काश्मीरचे महाराज हरी सिंग यांनी भारतात काश्मीरच्या विलयासाठी स्वाक्षर्‍या केल्या. त्यावेळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले होते. या स्वाक्षर्‍या झाल्यानंतर भारतीय वायुसेना व लष्कराचे जवान जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आणि बडगाममध्ये पहिल्यांदा लष्कर उतरले. यामुळे पाकिस्तानला उर्वरीत भागावर अवैध कब्जा मिळवता आला नाही. पाकिस्तान व्याप्त काश्मीरही एक दिवस भारताच्या ताब्यात असेल, असे एअर मार्शल अमित देव म्हणाले.

यावेळी त्यांना पीओके ताब्यात घेण्याची कोणती योजना आहे का? असा प्रश्‍न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला होता. यावर त्यांनी या घडीला पीओके ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही. मात्र त्यांनी पीओकेमधील नागरिकांवर पाकिस्तान करीत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. संपूर्ण काश्मीर एक आहे. पाकीस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या भावनाही संपूर्ण काश्मीर आणि संपूर्ण देश एक असल्याच्या आहेत. आज आणि उद्या सर्व देश एकत्र येईल, असे सांगून पाकिस्तान पीओकेमधील नागरिकांना चांगली वागणूक देत नसल्याचे एअर मार्शल अमित कुमार यांनी अधोरेखित केले.

पीओकेमध्ये, तसेच जगभरात इतरत्र असलेल्या पाक व्याप्त काश्मीरच्या नागरिकांकडून पाकिस्तान करीत असलेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने होत आहेत. गेल्या आठवडभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर एअर मार्शल अमित कुमार यांनी केलेल्या या विधानाचे महत्त्व वाढते. तसेच एक दिवस पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असेल, असा विश्‍वास व्यक्त करून एअर मार्शल अमित कुमार यांनी यातून सूचक इशाराही दिल्याचे दिसते.
यावेळी जम्मूच्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना एअर मार्शल अमित कुमार यांनी या हल्ल्यात फारसे नुकसान झालेले नाही. मात्र आता आम्ही अशा ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहोत. यासाठी तंत्रज्ञानाची खरेदीही केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन बुधवारीही सुरू होते. हा ऑपरेशनचा १६ वा दिवस होता. याबाबत अद्याप कोणतेही तपशील मिळालेले नाही. मात्र मंगळवारी या ऑपरेशनदरम्यान मोठा शस्त्रसाठा सापडला होता. तसेच बुधवारी पुन्हा एकदा एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. जमान-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

leave a reply