पर्शियन आखातात विमानवाहू युद्धनौका उतरवून इराणचे अमेरिकेला आव्हान

तेहरान – हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, गस्ती बोटी, लष्करी वाहने आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ‘शहिद रौदाकी’ या युद्धनौकेचे इराणने जलावतरण केले. 150 मीटर लांबीची ही युद्धनौका विमानवाहू असल्याचा दावा इराणचे ‘रिव्होल्युशनरी गार्ड्‌स’ (आयआरजीसी) करीत आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला इराणकडून निर्णायक प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी काही तासांपूर्वीच इराणने दिली होती. त्यानंतर ‘आयआरजीसी’ने सदर युद्धनौकेचे जलावतरण करून अमेरिका व मित्रदेशांना इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

Advertisement

इराणच्या ‘आयआरजीसी’ने गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर ‘शहिद रौदाकी’ या युद्धनौकेचे फोटोग्राफ्स तसेच त्याची माहिती प्रसिद्ध केली. अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ या अजस्र विमानवाहू युद्धनौकेच्या निम्म्या आकाराची असलेली इराणची ही युद्धनौका विमाने देखील वाहून नेऊ शकते, असे ‘आयआरजीसी’ने म्हटले आहे. पण पाश्‍चिमात्य विश्‍लेषक व माध्यमांनी फोटोग्राफ्सच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सदर युद्धनौकेवर फक्त हेलिकॉप्टर उतरविण्याची सोय आहे.

दरम्यान, इराणचे नौदल आता आखातातील गस्तीमोहिमातून बाहेर पडणार असल्याचे ‘आयआरजीसी’चे प्रामुख ॲडमिरल अली रेझा तांगसिरी यांनी स्पष्ट केले. हिंदी महासागरातील मोहिमांबाबत इराणचे नौदल विचार करीत असल्याचे ॲडमिरल तांगसिरी यांनी म्हटले आहे.

या युद्धनौकेचे जलावतरण करून इराणने पर्शियन आखातात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकांना आव्हान दिल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ पर्शियन आखातातू अरबी समुद्रासाठी रवाना झाल्यानंतर इराणने सदर युद्धनौकेचे जलावतरण केल्याचे पाश्‍चिमात्य माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply