इराण युरेनियमचे संवर्धन 90 टक्क्यांपर्यंत नेऊ शकेल – इराणच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा

तेहरान – ‘इराणची अणुऊर्जा संस्था सध्या 20 ते 60 टक्क्यांपर्यंत युरेनियमचे संवर्धन करीत आहे. पण येत्या काळात इराणच्या नेतृत्वाला गरज भासली तर इराण हेच संवर्धन 90 टक्क्यांपर्यंतही नेऊ शकतो’, अशी खळबळ उडविणारी घोषणा इराणचे मावळते राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली. याद्वारे इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या खूपच जवळ पोहोचल्याचा संदेश इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्याचा दावा केला जातो. अशा काळात अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी इराणने रोखल्याच्या बातम्या येत आहेत.

युरेनियमचे संवर्धन

इराणच्या कॅबिनेट बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी 90 टक्के युरेनियम संवर्धनाची घोषणा केली. त्याचबरोबर पाश्‍चिमात्य देशांच्या इराणविरोधी कारवायांवर रोहानी यांनी टीका केली. इराणचा फोर्दो अणुप्रकल्प बंद पाडण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी प्रयत्न केले. पण सध्या हा अणुप्रकल्प अधिक वेगाने काम करीत असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला. इराण 2015 सालच्या अणुकराराशी बांधिल नसल्यामुळे आण्विक तंत्रज्ञान मिळविण्याच्या वेगवेगळ्या शक्यतांवर विचार करीत असल्याचे, रोहानी यांनी बजावले.

त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपिय महासंघाबरोबर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटीचा उल्लेख इराणच्या मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी केला. ‘या अणुकरारावर तोडगा काढण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांकडे सहा महिने होते. पण त्यांनी ही संधी वाया दवडली. यापुढे इराणचे भावी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी याबाबतचा निर्णय घेतील’, असे सांगून रोहानी बायडेन प्रशासनाला इशारा दिल्याचा दावा केला जातो. मात्र अणुकार्यक्रमाबाबत हे दावे करीत असताना, राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अणुकरारातील दिरंगाईसाठी इराणच्या धार्मिक नेतृत्वावर टीका केल्याची माहिती या देशातील माध्यमांनी दिली आहे.

युरेनियमचे संवर्धन2015 सालचा अणुकरार लवकर पुनरुज्जीवित होऊ नये, यासाठी धार्मिक नेते आणि सरकारबाहेरील कट्टरपंथियांनी विरोध केल्याचा आरोप रोहानी यांनी केला. थेट नाव घेण्याचे टाळले असले तरी मावळते राष्ट्राध्यक्ष रोहानी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना लक्ष्य करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याआधीही अणुकरार आणि इतर मुद्यांवरुन जहालमतवादी खामेनी आणि सुधारणावादी रोहानी यांच्यात तीव्र मतभेद असल्याचे समोर आले होते. इराणचे भावी राष्ट्राध्यक्ष राईसी हे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांचेच हस्तक मानले जातात. त्यामुळे संवर्धित युरेनियमबाबतची घोषणा करून रोहानी यांनी पाश्‍चिमात्य देशांना इशारा देऊन, रईसी यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

2015 सालच्या अणुकरारानुसार, इराणला आपल्या अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन 3.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे बंधनकारक होते. पण अणुकरारातून माघार घेतल्यानंतर इराणने हे संवर्धन 60 टक्क्यांपर्यंत नेले आहे. त्याचबरोबर सेंट्रिफ्यूजेसची संख्याही मर्यादेबाहेर वाढविली. इराणच्या अणुकार्यक्रमातील ही प्रगती भयावह असून इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या दिशेने पावले टाकत असल्याचा दावा इस्रायली तसेच पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाच्या प्रगतीबाबत दिलेली ही माहिती संवेदनशील ठरते आहे.

leave a reply