इराणच्या कराज प्रकल्पावरील घातपाताला इस्रायल जबाबदार – इराणच्या सरकारचा आरोप

कराजतेहरान – ‘इराणचा अणुकार्यक्रम आपण रोखू शकतो व यासाठी पाश्‍चिमात्य देशांना इराणबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, हे दाखवून देण्यासाठी इस्रायलने गेल्या महिन्यात कराज प्रकल्पावर हल्ला चढविला होता’, असा आरोप इराणच्या सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी केला. मात्र या हल्ल्यात इराणचे विशेष नुकसान झाले नव्हते, असे राबेई पुढे म्हणाले. त्यांच्या या दाव्याला छेद देणारी माहिती इस्रायली माध्यमांनी दिली असून कराजवरील हल्ल्यात इराणी प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, सोमवारी कराज येथील एका गोदामात चमत्कारिकरित्या आगीने पेट घेतला. यात सदर गोदामाचे मोठे नुकसान झाले. इराणमध्ये याआधी झालेल्या स्फोटांप्रमाणे या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे.

गेल्या महिन्यात इराणची राजधानी तेहरानजवळ असणार्‍या कराज शहरातील आण्विक प्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाले होते. कराज प्रकल्पावर एक नाही तर ड्रोन्सच्या स्वार्म्सनी हल्ले चढविल्याची माहिती इराणमधील सूत्रांनी दिल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले होते. तसेच या हल्ल्यात कराज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही या सूत्रांनी केला. या हल्ल्यामुळे इराणला हा प्रकल्प बंद ठेवावा लागला होता.

कराजया घटनेला दोन आठवडे उलटल्यानंतर इराणने मंगळवारी कराज प्रकल्पासंबंधी माहिती देताना या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले. इराण आणि पाश्‍चिमात्य देशांमध्ये व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी मोडीत काढण्यासाठी इस्रायलने या हल्ला केल्याचा आरोप राबेई यांनी केला. तसेच या हल्ल्यात सदर प्रकल्पाच्या केवळ छताचे नुकसान झाल्याची माहिती राबेई यांनी दिली. पण इस्रायली माध्यमे आणि इस्रायलच्या खासगी गुप्तचर संघटनांनी सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करून या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचे दावे केले आहेत.

ड्रोन्सच्या हल्ल्यामुळे कराज प्रकल्पावरील छताची जबर हानी झाली. त्याचबरोबर या आगीने मोठे नुकसान केल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे. कराज प्रकल्पात सेंट्रिफ्युजेसची निर्मिती केली जाते. त्यामुळे या हल्ल्यात सेंट्रिफ्युजेसचे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.
आण्विक प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरण्याच्या काही तास आधी, कराज येथील एका गोदामात सोमवारी संध्याकाळी आग लागली. या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर गोदाम कशासाठी वापरले जात होते, याचीही माहिती उद्याप उघड झालेली नाही. मात्र गोदामाला लागलेली आग मोठी होती, असा दावा केला जातो.

कराजगेल्या दीड वर्षांपासून इराणमध्ये लष्करी तसेच संरक्षणाशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर संशयास्पदरित्या स्फोट होऊन आग भडकण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नातांझ अणुप्रकल्पातील स्फोटापासून ते कराज येथील गोदामाला लागलेल्या आगीचा समावेश आहे. इराणचे नेते व लष्करी अधिकारी या घटनांसाठी इस्रायलला जबाबदार धरत आहेत. पण इस्रायलने इराणच्या कुठल्याही आरोपांवर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजधानी तेहरानसह इराणच्या प्रमुख शहरांमध्ये वीजपुरवठा खंडीत होऊन ब्लॅकआऊट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. इराणमधल्या या ब्लॅकआऊटसाठी मावळते राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी दिलगिरी व्यक्त करून इराणच्या जनतेची माफी मागितली आहे.

leave a reply