ड्रोन्सच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक प्रकल्पाचे नुकसान – इराणमधील सूत्रांच्या हवाल्याने इस्रायली माध्यमांचा दावा

जेरूसलेम – इराणच्या बुशेहर प्रकल्पाच्या इमर्जन्सी शटडाऊनचे कारण अद्याप उघड झालेले नसताना बुधवारी राजधानी तेहरान येथील आण्विक प्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाले. याआधी इराणच्या लष्कर आणि सरकारशी संलग्न माध्यमांनी प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्याचा कट उधळल्याचा दावा केला होता. पण हे ड्रोन्सचे हल्ले यशस्वी ठरले असून यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायलच्या माध्यमांनी म्हटले आहे. इराणबरोबरचा अणुकरार नव्याने लागू करण्यासाठी बायडेन प्रशासनाने हालचाली तीव्र केल्या आहेत. अशा परिस्थितीत, इराणच्या अणुप्रकल्पांवरचे हे हल्ले म्हणजे इराणबरोबरच बायडेन प्रशासनाला इस्रायलने दिलेले इशारे असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेच्या न्यायविभागाने दोन दिवसांपूर्वी इराणमधील व इराणशी संलग्न असलेल्या सुमारे 36 वृत्तसंस्थांवर बंदी टाकली. यामध्ये इराणच्या सरकारी मुखपत्रापासून, वृत्तवाहिन्या, रिव्होल्युशनरी गार्ड्ससंबंधित संकेतस्थळे, रेडिओवाहिन्यांचा समावेश आहे. यामुळे इराणमधील घडामोडींचे तपशील समोर येण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत, इराणचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी सकाळी तेहरान येथील कराज प्रकल्पावरील घातपाती हल्ला उधळल्याचे जाहीर केले. इथे ड्रोनच्या सहाय्याने हल्ला चढविण्याचा प्रयत्न झाला, पण सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई केल्याची माहिती इराणी यंत्रणांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

सदर ड्रोन इराणमधूनच प्रक्षेपित केला होता, याची माहिती इराणच्या यंत्रणांनी आधीच दिली होती. पण बुधवार संध्याकाळी इस्रायली वर्तमानपत्राने इराणमधील विरोधी पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने धक्कादायक माहिती उघड केली. कराज प्रकल्पावर एक नाही तर छोट्या ड्रोन्सचे अनेक हल्ले झाले. सेंट्रिफ्यूजेसच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे प्रकल्प हे या हल्ल्याचे लक्ष्य होते. यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे. याला दुजोरा मिळू शकलेला नाही. पण कराज प्रकल्प इस्रायलच्या हिटलिस्टवर होता, हे याआधी उघड झाले होते.

राजधानी तेहरानमधील कराज येथे ‘कृषी आणि वैद्यकीय संशोधन केंद्र’ असून याचा नागरी वापर केला जात असल्याचा दावा इराण करीत आहे. पण सदर प्रकल्प इराणच्या अणुऊर्जा संस्थेच्या नियंत्रणात येतो. त्याचबरोबर 2007 सालापासून इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संलग्न असल्यामुळे, अमेरिका, युरोपिय महासंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकल्पावर निर्बंध लादले होते. या प्रकल्पात सेंट्रिफ्यूजेसची निर्मिती करून त्याचा वापर नातांझ आणि फोर्दो येथील प्रकल्पांमध्ये केला जात असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

2015 सालच्या अणुकरारानंतर सदर प्रकल्पाला निर्बंधातून वगळले होते. पण दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सदर प्रकल्पावर निर्बंध लादले होते. तर वर्षभरापूर्वी इस्रायलने अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसमोर ठेवलेल्या हिटलिस्टमध्ये कराज प्रकल्पाचा देखील समावेश होता, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. त्याद्वारे कराज प्रकल्पावरील हल्ल्यामागे इस्रायल असल्याचे संकेत ही माध्यमे देत आहेत. पण इस्रायली लष्कराने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

leave a reply