अमेरिकेच्या बॉम्बर्सना इराण लक्ष्य करणार

तेहरान – पर्शियन आखातात दाखल झालेली अमेरिकेची ‘बी-५२एच’ बॉम्बर्स विमाने किंवा आण्विक पाणबुडीने इराणच्या हद्दीत घुसखोरी केली, तर ही विमाने पाडण्याची मागणी इराणमध्ये होत आहे. इराणमधील संशोधक, प्राध्यापकांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एअरोस्पस कमांडचे प्रमुख ब्रिगेडिअर जनरल आमिर अली हाजिदेह यांच्याकडे ही मागणी केली.

इराणच्या विद्यापीठांमध्ये शिकविणारे सुमारे ८४० संशोधक व प्राध्यापकांनी अशी मागणी करणारे पत्र हाजिदेह यांच्याकडे पाठविल्याचे इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षी इराकमध्ये कासेम सुलेमानी यांच्या हत्येनंतर हाजिदेह यांनी अमेरिकेच्या लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्याला या संशोधकांनी समर्थन दिल्याचे इराणी वृत्तसंस्थेने सांगितले.

गेल्या महिन्याभरात अमेरिकेने आखाती क्षेत्रात ‘बी-५२’ बॉम्बर्स, आण्विक पाणबुडी आणि विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराणचा वाढता धोका लक्षात घेऊन आखातातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी ही तैनाती करीत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते.

leave a reply