अणुकार्यक्रमाबाबत इराणचे इरादे चिंताजनक

- ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीची टीका

लंडन/बर्लिन – नातांझ अणुप्रकल्पात ॲडव्हान्सड् सेंट्रीफ्युजेस बसविण्यासाठी इराणने सुरू केलेल्या हालचाली अतिशय चिंताजनक आहे. इराण आपल्या अणुप्रकल्पात करीत असलेला हा बदल 2015 साली झालेल्या अणुकराराचे उल्लंघन ठरते. अणुकरारावर वाटाघाटी हव्या असतील तर इराणने हे सारे थांबायला हवे, असा इशारा असे ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने दिला आहे.

अणुकार्यक्रम

आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढवून अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येचा सूड घेण्याची तयारी इराणने केली आहे. गेल्या आठवड्यात इराणच्या संसदेत अणुकार्यक्रमाचा वेग वाढविण्याचे विधेयक सादर करण्यात आले होते. अमेरिकेने इराणच्या इंधन आणि बँकिंग क्षेत्रावर लादलेल्या निर्बंधातून मोकळीक दिली नाही तर अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन वाढविण्यात यावे; तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांसाठी इराणच्या अणुप्रकल्पांचे निरिक्षण बंद करण्यात यावे, या मुद्यांचा या विधेयकात समावेश करण्यात आला होता. इराणच्या संसदेमध्ये सदर विधेयक मंजूर झाले असून राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्या स्वाक्षरीनंतर याची अंमलबजावणी होऊ शकते. गेल्या महिन्यातच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी दिलेला अहवाल चिंताजनक होता. या अहवालानुसार, इराणने नातांझ अणुप्रकल्पात ॲडव्हान्सड् सेंट्रीफ्युजेस बसवून त्यावर प्रक्रिया सुरू केल्याचे म्हटले होते. इराणने उचलेले हे पाऊल 2015 सालच्या अणुकराराच्या मर्यादा ओलांडणारे असल्याचे अणुऊर्जा आयोगाने म्हटले होते.

अणुऊर्जा आयोगाचा अहवाल व गेल्या आठवड्यात इराणच्या संसदेत पारित झालेले विधेयक, या दोन्ही घडामोडींवर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने सोमवारी चिंता व्यक्त केली. युरोपमधील ‘ई थ्री’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणचे इरादे अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ‘नातांझ अणुप्रकल्पात ॲडव्हान्सड् सेंट्रीफ्युजेसचे तीन कॅस्केड बसविण्यासंबंधी इराणने केलेली घोषणा 2015 सालच्या अणुकरारातील विरोधी आहे’, असे ताशेरे ‘ई थ्री’ने ओढले.

अणुकार्यक्रम

अणुकार्यक्रमाबाबत सुरू असलेल्या इराणमधील या हालचालींची या तीनही देशांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच इराणने अणुप्रकल्पात ॲडव्हान्सड् सेंट्रीफ्युजेस बसविण्यास सुरुवात केल्यास अणुकराराच्या मर्यादांचे उल्लंघन ठरेल, याची जाणीव युरोपिय देशांनी करुन दिली. त्याचबरोबर अमेरिकेतील आगामी प्रशासनाबरोबर वाटाघाटी करायच्या असतील, तर इराणला आपले विधेयक मागे घ्यावे लागेल, असा इशारा युरोपिय देशांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनातून दिला.

इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याकडे इराणची सर्व सूत्रे आहेत. फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नसल्याची घोषणा खामेनी यांनीच केली होती. तसेच इतर संशोधक व अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन इराणच्या अणुकार्यक्रमाला वेग देण्याची सूचना खामेनी यांनी केली होती.

दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणसमोर मागण्या ठेवून नव्या अणुकरारासाठी आवाहन केले आहे. पण इराणला निर्बंधातून मुक्त केल्याशिवाय अणुकरारावर चर्चा शक्य नसल्याची शर्त इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी ठेवली आहे.

leave a reply