‘आयएस’ची ‘अल हिंद’ दक्षिण भारतात तळ उभारण्याच्या तयारीत होती

- 'एनआयए'च्या आरोपपत्रातील खुलासा

नवी दिल्ली – गेल्यावर्षी दक्षिण भारतात विविध ठिकाणी छापे टाकून ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचे भारतातील मॉड्यूल ‘अल-हिंद’ तपास यंत्रणांनी नष्ट केले होते. या छाप्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या १७ दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यानुसार ‘अल-हिंद’ दक्षिण भारतात तळ स्थापण्याच्या तयारीत होती, असे स्पष्ट होत आहे.

'आयएस'ची 'अल हिंद' दक्षिण भारतात तळ उभारण्याच्या तयारीत होती - 'एनआयए'च्या आरोपपत्रातील खुलासाकर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘आयएस’च्या अल हिंदचे मॉड्युल नष्ट करण्यात आले होते. यावेळी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून बरेच खुलासे झाले आहेत. एनआयएने आपल्या आरोपपत्रात याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. दक्षिण भारतात तळ उभारून ‘आयएस’चा प्रभाव या भागात वाढविण्याची योजना आखण्यात आली होती. दहशतवाद्यांनी कुप्रसिद्ध तस्कर वीरप्पनवर लिहिलेली पुस्तके खरेदी केली होती. या पुस्तकांमध्ये वीरप्पन पोलिसांना चकमा देऊन बरीच वर्षे जंगलात राहण्यात कसा यशस्वी ठरला होता याचा उल्लेख आहे.

अल हिंदच्या चार दहशतवाद्यांनी नोव्हेंबर २०१९मध्ये कर्नाटकातील शिवानासमुद्र प्रदेशाची पाहणी केली होती. या भागात आपला तळ उभारून अल हिंदचा देशातील पहिला प्रांत प्रस्थापित करायचा होता आणि येथे इस्लामिक स्टेटचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. तसेच शस्त्रे, स्फोटके आणि इतर साहित्यही दहशतवाद्यांनी गोळा केली होती. तसेच या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर काही नेते, अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. ह्या हत्या करून कर्नाटकच्या कोलार, कोडागु तसेच गुजरातच्या जांबूसार, महाराष्ट्रातील रत्नागिरी, आंध्र प्रदेशातील चित्तूर, आणि पश्चिम बंगालच्या बर्दवान आणि सिलिगुडीमध्ये लपून राहण्याची योजना होती.

यातील दोन प्रमुख दहशतवादी मोईद्दीन आणि पाशाच्या चिथवाणीवर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) विरोधात निदर्शने झाली होती, असे एनआयएने आरोपपत्रात नमूद केले आहे. २०१४ साली तामिळनाडूमधील नेते के. पी सुरेश कुमार यांच्या हत्येप्रकरणी मोईदीनला अटक करण्यात आली होती. पण जुलै २०१९ मध्ये त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. तेव्हापासून नवीन मॉड्यूल तयार करण्यासाठी मोईदीन हा पाशाच्या संपर्कात होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे. या संघटनेचे काही सदस्य अद्याप फरार असल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

leave a reply