आयएस-खोरासनने अफगाणिस्तानातील आत्मघाती स्फोटाची जबाबदारी स्वीकारली

स्फोटाची जबाबदारीकाबुल – शुक्रवारी दुपारी कुंदूझ येथील प्रार्थनास्थळात जवळपास शंभरजणांची हत्या घडविणार्‍या स्फोटाची जबाबदारी ‘आयएस-खोरासन’ने स्वीकारली. आपल्या आत्मघाती दहशतवाद्याने हा स्फोट घडविल्याचे सांगून आयएसने हल्लेखोराचे नावही जाहीर केले. ‘मोहम्मद अल-उघूरी’ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो चीनच्या झिंजियांग प्रांताचा होता. तालिबान आणि कुंदूझमधील जनता चीनच्या दबावाखाली अफगाणिस्तानातून उघूरवंशियांची हकालपट्टी करीत आहेत. त्यामुळे तालिबानसह चीनला इशारा देण्यासाठीच हा स्फोट घडविल्याचे आयएसने म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदूझ प्रांताची राजधानी कुंदूझ शुक्रवारी आत्मघाती स्फोटाने हादरली. आयएस-खोरासनने सोशल मीडियाद्वारे येथील शियापंथियांच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. स्फोटाची तीव्रता आणि जखमींची अवस्था पाहिल्यानंतर स्थानिक यंत्रणांनी मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली आहे. या स्फोटामागे आयएस असल्याचे उघड झाल्यानंतर अफगाणिस्तानात दोन दहशतवादी संघटनांमध्ये संघर्ष भडकणार असल्याचा दावा पाश्‍चिमात्य वृत्तवाहिन्या करीत आहेत.

आत्मघाती दहशतवादी चीनच्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशिय असल्याचे समोर आल्यानंतर आयएस व ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-इटीआयएम यांच्यात सहकार्य झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. आत्तापर्यंत ‘इटीआयएम’चे तालिबानबरोबर सहकार्य करीत होते. अफगाणिस्तानच्या ईशान्य तर पाकिस्तानच्या वायव्य भागात इटीआयएमच्या दहशतवाद्यांचा तळ असल्याचे उघड झाले होते. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये तालिबानने चीनबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या. चीनच्या सहकार्याच्या मोबदल्यात इटीआयएमच्या दहशतवाद्यांना आपल्या हवाली करण्याची मागणी तालिबानकडे केली आहे. यानंतर इटीआयएमचे दहशतवादी तालिबानच्या विरोधात जाऊन आयएस-खोरासनमध्ये सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

कुंदूझ येथील स्फोटात आयएसचा दहशतवादी उघूरवंशिय असल्याचे उघड झाल्यानंतर सदर सहकार्य उघडपणे समोर आले आहे. या स्फोटानंतर चीन आणि पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानातील आपल्या दूतावास व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचा दावा केला जातो. अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघासह प्रमुख देशांनी कुंदूझमधील आत्मघाती स्फोटावर चिंता व्यक्त केली आहे.

स्फोटाची जबाबदारीदरम्यान, ही घटना ताजी असताना कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका व तालिबानचे प्रतिनिधी वाटाघाटीसाठी एकत्र आले आहेत. तालिबानने काबुलचा ताबा मिळविल्यानंतर या संघटनेची अमेरिकेशी होणारी ही पहिलीच चर्चा ठरते. या चर्चेआधी आयएसच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात सुरू केलेल्या हल्ल्यांचा मुद्दा तालिबानसमोर उपस्थित करण्यात आला.

आयएसवर कारवाई करण्यासाठी तालिबान अमेरिकेचे सहाय्य घेणार का? असा सवाल आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहिन यांना केला. तालिबान स्वतंत्रपणे आयएसविरोधी कारवाई करू शकते व यासाठी अमेरिकेचे सहाय्य घेणार नसल्याचे शाहिन यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आयएस हे तालिबानसमोरील फार मोठे आव्हान नाही, तर ती साधारण डोकेदुखी असल्याचे सांगून तालिबान आपण आयएसला फारशी किंमत देत नसल्याचे दाखवित आहे. पण प्रत्यक्षात तालिबानमधील नाराज गट आयएसमध्ये सहभागी झाले असून हीच आयएसची खरी ताकद असल्याचे समोर येत आहे. तालिबानला धक्का देणारे घातपात घडवून आयएस-खोरासानने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. त्यामुळे तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण प्रस्थापित करता येईल का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात अल कायदा, आयएस किंवा इतर दहशतवादी संघटना प्रबळ झाल्या, तर अमेरिका अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढवू शकते, असे संकेत अमेरिकेचे संरक्षणमंत्री तसेच संरक्षणदलप्रमुख आणि सेंटकॉमच्या प्रमुखांनी दिला होता.

leave a reply