काबुल विमानतळावर स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस-खोरासन’चे तालिबानशी संबंध आहेत

- अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह

पंजशिर/काबुल – आपला ‘आयएस-खोरासन’ गटाशी संबंध नाही सांगणारे तालिबान त्यांच्या मालकाकडून अर्थात पाकिस्तानकडून चलाखीने खोटे बोलायला शिकले आहेत, असा टोला अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी लगावला. गुरुवारी काबुल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांची जबाबदारी ‘आयएस-खोरासन’ या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. त्यानंतर सालेह यांनी तालिबानवर विश्‍वास ठेवू नका, असा सल्ला अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेला आहे.

काबुल विमानतळावर स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस-खोरासन’चे तालिबानशी संबंध आहेत - अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेहतालिबानने गेल्या आठवड्यात राजधानी काबुलमध्ये प्रवेश करून संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजधानी काबुलची सुरक्षाव्यवस्था तालिबानने हाती घेतली असून जागोजागी सुरक्षा चौक्या उभ्या केल्या आहेत. काबुलमधील विमानतळाच्या बाहेरही तालिबानचे दहशतवादी गस्त घालत असून अफगाणिस्तानातून बाहेर जाणाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी अमेरिका व ब्रिटनच्या यंत्रणांनी काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याचा इशारा दिला होता.

गुरुवारी विमानतळाच्या बाहेर असलेल्या ‘ॲबे गेट’ व ‘बॅरोन हॉटेल’च्या परिसरात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडविले. या स्फोटानंतर तालिबानने आपले सदस्यही यात मारले गेल्याचा दावा केला. त्याचवेळी अफगाणिस्तानमधील ‘आयएस-के’ व तालिबानचा संबंध नसल्याचा खुलासाही तालिबानने केला आहे. पण अमरूल्लाह सालेह यांनी तिखट शब्दात याचा समाचार घेतला.

काबुल विमानतळावर स्फोट घडविणाऱ्या ‘आयएस-खोरासन’चे तालिबानशी संबंध आहेत - अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह‘अफगाणी यंत्रणांच्या हातात उपलब्ध पुराव्यांमध्ये आयएस-खोरासन गटाची पाळेमुळे तालिबान व हक्कानी नेटवर्कमध्येच असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. काबुलमध्ये सक्रिय असणारे ‘आयएस-के’चे गट तालिबानशी संबंध ठेऊन आहेत. असे असतानाही तालिबान आयएसशी संबंध असल्याचे नाकारत आहे. यापूर्वी पाकिस्ताननेही क्वेट्टा शहरातील शूरा कौन्सिलशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले होते. तालिबानचे निवेदन त्याचीच पुनरावृत्ती आहे. आपल्या मालकांकडून तालिबान चलाखीने खोटे बोलायला शिकल्याचे दिसत आहे’, असे घणाघाती टोले सालेह यांनी लगावले.

अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशामागे पाकिस्तानचे असल्याचे उघडपणे समोर येऊ लागले आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनीही पाकिस्तानचा उल्लेख आपले दुसरे घर असल्याचे करून दोघांमध्ये असलेली जवळिक दाखवून दिली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे नेतृत्त्व इतर देशांनी तालिबानला मान्यता द्यावी म्हणून धडपडत असल्याचेही समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर काबुल विमानतळावर झालेला हल्ला लक्ष वेधून घेणारी घटना ठरली असून, त्यामुळे अफगाणिस्तानमधील अराजक अधिकच वाढले आहे. अशा परिस्थिती काबुलच्या विमानतळावरील स्फोटामागे तालिबानच असल्याचे सांगून सालेह यांनी तालिबानच्या शब्दांवर विश्‍वास न ठेवण्याचा सल्ला अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदायाला दिला आहे.

leave a reply