‘लश्‍कर व हिजबुल’च्या घुसखोरीसाठी ‘आयएसआय’चा कट

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील (एलओसी) संघर्षबंदीच्या उल्लंघनाला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’ने वेगळ्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आयएसआय’ने लश्‍कर-ए-तोयबा आणि हिजबुलच्या प्रमुखांशी चर्चा करुन दहशतवाद्यांची घुसखोरी घडविण्याची कट आखल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुमारे ८० दहशतवादी ‘एलओसी’च्या पलिकडील तीन लाँचपॅड्सवर घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून समोर येत आहे.

‘आयएसआय’

पाकिस्तानी लष्कराकडून ‘एलओसी’ तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवरील कारवाया तीव्र होत आहेत. रविवारी पाकिस्तानी रेंजर्सनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील कथूआ जिल्ह्यावर जोरदार गोळीबार केला. येथील हिरानगर सेक्टरमधील पानसर-मन्यारी भागात पाकिस्तानी रेंजर्सनी मोठे हल्ले चढविले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी रेंजर्सच्या या गोळीबाराला जोरदार उत्तर दिले. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानी लष्कराने एलओसी’वरील आपल्या हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. हिवाळा जवळ येत असून त्याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांची घुसखोरी घडविण्याची योजना पाकिस्तानी लष्कर व ‘आयएसआय’ने आखली आहे.

यासाठी ‘आयएसआय’ने हफीझ सईद आणि सय्यद सलाहुद्दीन या दहशतवादी नेत्यांची चर्चा करुन सीमेवरील घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना रवाना करण्याची सूचना केली आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील कोटली आणि निकिआल या भागात ‘आयएसआय’चे अधिकारी आणि हफीझ-सलाहुद्दीन यांच्यात दोन वेळा यासंबंधी चर्चा झाल्याची माहित समोर आली आहे. या कारवाईसाठी ‘आयएसआय’ने या दोन्ही दहशतवादी संघटनांना मोठी रक्कम पुरविल्याचाही दावा केला जातो.

तर गुप्तचर यंत्रणेच्या एका अहवालातून समोर आलेल्या माहितीत पाकव्याप्त काश्मीरमधील तीन लाँचपॅड्सवर सुमारे ८० ते ९० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. पाकिस्तानी लष्करातील ‘बॅट’चे जवान ही घुसखोरी घडविण्यासाठी दहशतवाद्यांना सहाय्य करू शकतात. काही दिवसांपूर्वी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील पाकिस्तानी लष्कर अडीचशे ते तीनशे दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याची कट आखत असल्याचे स्पष्ट केले होते.

leave a reply