इस्लामी देशांनी पॅलेस्टाईनच्या मुद्याला सर्वाधिक प्राथमिकता द्यावी

- इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी

इस्लामीतेहरान – ‘पॅलेस्टिनींच्या हितसंबंधाचा पुरस्कार करण्यासाठी इस्लामी देशांनी पुढाकार द्यायला हवा. हा मुद्दा नेहमी इस्लामी जगासाठी प्राधान्यक्रमावर असलाच पाहिजे’, असे आवाहन इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केले. इराणला सर्व इस्लामी देशांमध्ये स्थैर्य हवे असून अमेरिका व इस्रायल इस्लामी देशांमध्ये अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा आरोपही इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी लगावला आहे.

इराणची राजधानी तेहरानमध्ये आयोजित केलेल्या ३५व्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इस्लामिक युनिटी’ला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीत ५२ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी अमेरिका, इस्रायल व पाश्‍चिमात्य देशांवर जोरदार आरोप केले.

इस्लामी देश आत्ता कुठे पाश्‍चिमात्यांविरोधात जागृत होऊ लागले आहेत. ही आग विझता कामा नये, असे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. इस्लामी देशांमध्ये फूट पाडण्यासाठी पाश्‍चिमात्यांनी आयएस ही दहशतवादी संघटना उभारल्याचा गंभीर आरोप इराणच्या राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला.

‘आपले व इस्रायलचे हित जपण्यासाठी अहंकाराने भरलेल्या पाश्‍चिमात्य देशांनी मुस्लिम देशांमध्ये कमकुवत नेतृत्वाचे नेहमीच समर्थन केले’, असा ठपका रईसी यांनी ठेवला. पाश्‍चिमात्य देशांच्या या कारस्थानाविरोधात इस्लामी देशांनी एकजूट करावी आणि पॅलेस्टाईनला वाचविण्यासाठी लढा द्यावा. कारण पॅलेस्टाईन हा इस्लामी देशांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो, असा संदेश रईसी यांनी या बैठकीत दिला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी पॅलेस्टाईनबाबत केलेल्या आक्रमक आवाहनाला काही तास उलटत नाही तोच, गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलला धमकावले. पॅलेस्टाईनवरचा ताबा आणि गाझापट्टीची कोंडी इस्रायल काढून घेत नाही, तोपर्यंत इस्रायलवरील हल्ले सुरू राहतील. लवकरच हमास व इस्रायलमध्ये आणखी एक युद्ध भडकेल, अशी धमकी हमासने दिली आहे. ब्रिटनमधील आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही धमकी प्रसिद्ध केली.

गेल्या काही दिवसांपासून वेस्ट बँकमध्ये हमासचे समर्थक व इस्रायली सुरक्षा यंत्रणेतील संघर्षाच्या बातम्या समोर येत आहेत. मे महिन्यातील संघर्षानंतर वेस्ट बँकमधील हमासच्या समर्थकांमध्ये वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे इस्रायली माध्यमांनी लक्षात आणून दिले होते.

leave a reply