गोलान टेकड्यांवर इस्रायलचाच हक्क आहे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

जेरूसलेम – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचा संदेश परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी आपल्या इस्रायल दौऱ्यातून दिला. गोलान टेकड्यांवर इस्रायलचाच हक्क आहे, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी गोलानला दिलेल्या भेटीत केली. त्याचबरोबर, गोलान सिरियाला परत देण्यासाठी इस्रायलवर दबाव टाकणाऱ्या युरोप-अमेरिकेतील उच्चभ्रू व्यावसायिक गटांना पॉम्पिओ यांनी धारेवर धरले.

Advertisement

इस्रायलचा दौरा संपवून मायदेशी परतण्याआधी परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी इस्रायली परराष्ट्रमंत्री गाबी अश्‍केनाझी यांच्यासह गोलान टेकड्यांना भेट दिली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोलान टेकड्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची पॉम्पिओ यांनी आठवण करून दिली. अमेरिकेच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी गोलान टेकड्यांना इस्रायलचा भूभाग म्हणून मान्यता देण्याचे टाळले होते. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गोलानबाबत योग्य निर्णय घेऊन इस्रायलला आश्‍वस्त केले.

त्याचबरोबर गोलान टेकड्या सिरियाच्या हवाली करण्यासाठी अमेरिका व युरोपमधील प्रभावी व उच्चभ्रू व्यक्ती, संस्थांकडून इस्रायलवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी थेटपणे कुठल्याही व्यक्ती किंवा गटाचे नाव घेण्याचे टाळले. पण गोलान टेकड्या सिरियातील अस्साद राजवटीच्या ताब्यात गेल्या तर यामुळे इस्रायलच नाही तर पाश्‍चिमात्य देशांनाही धोका निर्माण होईल, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

पॉम्पिओ यांच्या या गोलान भेटीवर पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास तसेच सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी टीका केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची गोलान भेट म्हणजे गोलानवरील इस्रायलच्या अवैध ताब्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे दाखवून देणारे ठरते, असा आरोप अब्बास यांनी केला. तर पॉम्पिओ यांची गोलान भेट सिरियाला चिथावणी देणारी असल्याचा इशारा सिरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी दिला.

गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गोलान टेकड्यांबाबत ऐतिहासिक घोषणा केली होती. गोलानवर इस्रायलचा सार्वभौम अधिकार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर जगभरातून टीका झाली होती. सिरियातील अस्साद राजवट तसेच इराण आणि हिजबुल्लाहने गोलानवर हल्ले चढवून इस्रायलच्या ताब्यातून सोडविण्याची धमकी दिली होती.

पॉम्पिओ यांच्या इस्रायल दौऱ्याच्या काही तास आधी इस्रायली लष्कराने गोलानच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत केली होती. सिरियातील गोलान जवळच्या भागात चिथावणीखोर हालचाली करणाऱ्या इराण व इराणसंलग्न दहशतवादी गटांनी ही स्फोटके पेरल्याचा आरोप करून इस्रायलने सिरियातील इराणच्या कुद्स फोर्सेसच्या ठिकाणांवर हल्ले चढविले होते. या कारवाईत इराणचे जवान मारले गेल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला होता.

1967 साली झालेल्या इस्रायल-अरबदेशांच्या युद्धात इस्रायली लष्कराने सिरियाच्या ताब्यात असलेल्या गोलान टेकड्यांचा भूभाग जिंकला होता. त्यानंतर इस्रायलने याचा ताबा सोडला नाही. बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असताना, त्यांनी 1967 सालच्या युद्धाच्या आधीच्या सीमा मान्य करून इस्रायलने तडजोड करावी, असा प्रस्ताव दिला होता.

मात्र इस्रायलने हा प्रस्ताव झिडकारला व गोलान टेकड्यांवर आपला सार्वभौम अधिकार असल्याचे बजावले होते.

leave a reply