आपल्या मालवाहू जहाजावरील हल्ला इस्रायल खपवून घेणार नाही

- इस्रायलच्या अधिकार्‍यांचा इशारा

मालवाहूतेल अविव – ओमानच्या आखातात इस्रायली कंपनीच्या मालवाहू जहाजात झालेल्या गूढ स्फोटामागे इराण असल्याचा दावा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केला. पण या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अधिकृत स्तरावर कुठलीही भूमिका घेणार नसल्याचे गांत्झ यांनी स्पष्ट केले. मात्र या हल्ल्यानंतर इस्रायल अजिबात शांत राहणार नाही. आपल्या जहाजावरील हल्ला इस्रायल खपवून घेणार नाही, असा इशारा इस्रायलचे वरिष्ठ अधिकारी देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी ओमानच्या आखातातून प्रवास करणार्‍या इस्रायलच्या ‘हेलियॉस रे’ या मालवाहू जहाजात गूढ स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, ‘हेलियॉस रे’वरील स्फोटामागे इराण असल्याचा संशय व्यक्त केला.

‘इस्रायली जनता आणि इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्यासाठी इराण उतावीळ बनला आहे. त्यामुळे सदर जहाजावरील हल्ल्यामागे देखील इराण असेल यात शंकाच नाही. पण या हल्ल्याची चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यावरच इस्रायल आपली भूमिका मांडेल’, असे गांत्झ यांनी स्पष्ट केले. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इस्रायली जहाजावर दोन क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते, असा दावा इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीने सुरक्षा यंत्रणेच्या अधिकार्‍याच्या हवाल्याने केला आहे. पण त्याला अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही.

इस्रायलची मालकी असलेल्या या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायल शांत बसणार नाही. वेळ येताच इस्रायल हल्लेखोरांवर योग्य ती कारवाई करील, असे इस्रायली अधिकार्‍याने बजावले आहे. दरम्यान, इराणच्या वृत्तवाहिनीने इस्रायली जहाजावरील नुकसानाची तपशीलवार बातमी प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर लवकरच इस्रायली आणि अमेरिकी तपास पथक दुबईमध्ये दाखल होतील, असेही म्हटले आहे.

दरम्यान, 2019 साली इराणने पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या अमेरिकेच्या मित्रदेशांच्या जहाजांना लक्ष्य केले होते.

leave a reply