इस्रायल व अमेरिकन कंपन्या ‘लेझर डोम’ विकसित करणार

‘लेझर डोम’जेरूसलेम – दोन महिन्यांपूर्वी गाझातील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर चार हजारांहून अधिक रॉकेट हल्ले चढविले. ‘आयर्न डोम’ या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या सहाय्याने 90 टक्के रॉकेट हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. पण आयर्न डोमपेक्षाही भेदक आणि अचूक मारा करणारी ‘लेझर डोम’ विकसित करण्यासाठी इस्रायल व अमेरिका एकत्र आली आहे. शस्त्रनिर्मितीत आघाडीवर असलेल्या अमेरिकेच्या कंपनीने ही माहिती उघड केली.

सध्या इस्रायलचे संरक्षणदल ‘अ‍ॅरो-2’, ‘अ‍ॅरो-3’, ‘डेव्हिड्ज् स्लिंग’ आणि ‘आयर्न डोम’ या चार स्वदेशी बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज आहे. तर इस्रायलच्या ‘राफेल अ‍ॅडव्हान्स्ड् डिफेन्स सिस्टिम’ या कंपनीने तयार केलेली ‘आयर्न बिम’ ही लेझर यंत्रणा देखील इस्रायली लष्कराच्या ताफ्यात आहे. आयर्न डोमप्रमाणे लघुपल्ल्याचे रॉकेट्स, मॉर्टर बॉम्बचे हल्ले भेदण्यासाठी आयर्न बिमचा वापर होऊ शकतो व ही यंत्रणा आयर्न डोमपेक्षाही भेदक असल्याचे बोलल जाते.

‘लेझर डोम’पण आयर्न बिमपेक्षा अधिक भेदक, अचूक आणि यशस्वी मारा करणारी नवी अतिप्रगत लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा इस्रायली व अमेरिकी कंपनी विकसित करीत आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलची राफेल आणि अमेरिकेची लॉकहिड मार्टिन या आघाडीच्या कंपन्यांनी यासंबंधी करार केला. आयर्न डोमप्रमाणे सदर लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा जमिनीवरुन वापरण्यात येईल, असे अमेरिकन कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आपल्या माहितीत म्हटले आहे.

2024 सालापर्यंत इस्रायलचे संरक्षणदल या नव्या अतिप्रगत लेझर हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज असेल. यामुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेची क्षमता यामुळे अधिक भक्कम होईल. त्यानंतर या यंत्रणेची विक्री अमेरिकेच्या लष्करालाही केली जाईल, असे लॉकहिड मार्टिनने स्पष्ट केले. इस्रायलप्रमाणे अमेरिकेच्या सुरक्षेला सध्यातरी शेजारी देशांकडून लघुपल्ल्यांच्या रॉकेट किंवा मॉर्टर्सचा धोका नाही.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने आपल्या अतिप्रगत लष्करी तंत्रज्ञानाने आंतरराष्ट्रीय समुदायाला हादरे दिले आहेत. गाझापट्टीतील 11 दिवसांच्या संघर्षात इस्रायलने आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) तसेच ड्रोन स्वार्म्सचा वापर केल्याचे उघड झाले. या तंत्रज्ञाचा संघर्षात वापर करणारा इस्रायल पहिला देश ठरला. तर काही आठवड्यांपूर्वी इस्रायलने प्रवासी विमानातून लेझरचा मारा करून ड्रोन्स भेदले. याआधी अमेरिकेने लष्करी व नौदल आवृत्तीच्या लेझरची चाचणी घेतली होती. पण इस्रायलने एक पाऊल पुढे जाऊन विमानातून ड्रोन भेदून हवाई लेझर युद्धातील आपली क्षमता दाखवली होती.

leave a reply