सिरियन राजधानीजवळ इस्रायलचे हवाई हल्ले

- सिरियन वृत्तवाहिनीचा दावा

दमास्कस – बुधवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलच्या लष्कराने सिरियन राजधानी दमास्कसजवळ जोरदार हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये सिरियन लष्कराचे चार जवान जखमी झाल्याची माहिती सिरियन वृत्तवाहिनीने दिली. सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्याचा दावाही सिरियन वृत्तवाहिनीने केला आहे.

इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांच्या भागातून सिरियाच्या दिशेने क्षेपणास्त्रे प्रक्षेपित झाली, असा दावा सिरियन वृत्तवाहिनीने केला. काही क्षेपणास्त्रे लेबेनॉनच्या सीमाभागातूनही सिरियाच्या हद्दीत दाखल झाल्याचे या वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. मध्यरात्री १२.५६ मिनिटांनी झालेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये आपले जवान जखमी झाले तसेच काही वित्तहानी झाली. पण सिरियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलची बरीच क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याच दावा सदर वृत्तवाहिनीने केला.

सिरियातील मानवाधिकार संघटनेने हा दावा खोडून काढला. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी दमास्कसजवळ असलेल्या एका शस्त्रास्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केले. सदर गोदामे इराणच्या ताब्यातील होती. इस्रायलच्या या हल्ल्यांमध्ये ही गोदामे पूर्णपणे बेचिराख झाल्याची माहिती या मानवाधिकार संघटनेने दिली. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह संलग्न वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीत, इस्रायली लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचे म्हटले आहे. तसेच सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायली विमानांच्या दिशेने प्रक्षेपित केलेले एक क्षेपणास्त्र सिरिया-लेबेनॉनच्या सीमेवर कोसळल्याचा दावाही लेबेनीज वृत्तवाहिनीने केला.

दरम्यान, सिरिया तसेच लेबेनॉनच्या वृत्तवाहिन्यांमधून याआधीही इस्रायलच्या लष्कराने हल्ले चढविल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. आपल्या हवाई सीमेचे उल्लंघन करून इस्रायल हल्ले चढवित असल्याचा आरोप करून सिरियाने इस्रायल युद्धखोर असल्याचा ठपका ठेवला आहे. पण माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या या बातम्यांमधील दाव्यांना इस्रायलने पुष्टी दिलेली नाही. मात्र इस्रायलच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरणार्‍या हिजबुल्लाह व इराणसंलग्न दहशतवाद्यांना शस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचा इशारा इस्रायलच्या नेत्यांनी याआधीच दिला होता. तसेच आपले हे हवाई हल्ले कुणीही रोखू शकणार नसल्याचे इस्रायलने बजावले होते.

leave a reply