जम्मू-काश्मीरमध्ये २०२२ सालापर्यंत ५१ हजार कोटींची गुंतवणूक येईल

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

• केंद्रीय गृहमंत्र्यांचा जम्मूतील सीमा चौक्यांचा दौरा

• सीमेवरील ग्रामस्थांशीही संवाद साधला

• पुंछमधील चकमकीत एक दहशतवादी ठार
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जम्मूमधील सीमा चौक्यांना भेट दिली. येथील बीएसएफच्या बंकर्समध्ये काही वेळ घालविल्यानंतर सीमा भागातील गावातील ग्रामस्थांशीही केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी संवाद साधला. जम्मू-काश्मीरची शांतता कोणालाही भंग करू देणार नाही. दहशतवादामुळे एकाही व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागणार नाहीत, असे वातावरण तयार करण्याची सरकारची इच्छा आहे, असे यानंतर केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले. यापूर्वी एका सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक आली असल्याची बाब अधोरेखित केली. तर २०२२च्या अखेरीपर्यंत सुमारे ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जम्मू-काश्मीरमध्ये अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पाच लाख नवे रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्रीयमंत्री शहा यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २०२२ सालापर्यंत ५१ हजार कोटींची गुंतवणूक येईल - केंद्रीय गृहमंत्री अमित शहारविवारी केंद्रीयमंत्र्यांनी जम्मूमध्ये २१० कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या आयआयटी कॅम्पसचे उद्घाटन केले. तसेच विविध प्रकल्पांचे भूमीपूजनही केले. यावेळी त्यांनी पुढील दोन वर्षात जम्मू आणि श्रीनगर या प्रमुख शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू होईल असे जाहीर केले. दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर लाखो जणांना आपले अधिकार मिळाले आहेत, ही बाब त्यांनी आधोरेखित केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या ५५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २१ योजनाही पूर्ण झाल्या असल्याचे शहा म्हणाले.

यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या गुंतवणूकीबद्दल माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. आतापर्यंत १२ हजार कोटीहून अधिकची खाजगी गुंतवणूक जम्मू-काश्मीरमध्ये झाली आहे. तसेच २०२२ अखेरीपर्यंत ५१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जम्मू-काश्मीरमध्ये झालेली असेल, असा विश्‍वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. या गुंतवणूकीतून पाच लाख तरुणांना रोजगार मिळेल, असे केेद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले.

रविवारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बीएसएफ आणि आयबीच्या उच्चाधिकार्‍यांशी भेट घेऊन चर्चा केली. त्याआधी त्यांच्या जम्मूच्या सीमा भागाचा दौरा केला. येथील तीन सीमा चौक्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी भेट दिली. येथे उभारण्यात आलेल्या बंकर्सची पाहणी केली. यानंतर त्यांनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांशीही संवाद साधला यातून केंेद्रीयमंत्री शहा यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

याआधी एका कार्यक्रमात बोलताना जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. येथे दहशतवादी हल्ल्यात बळी जाणार्‍यांची संख्या कमी झाली आहे, ही बाब शहा यांनी अधोरेखित केली. मात्र तरी सुमारे ३० बळी दरवर्षी जात आहेत. त्यामुळे संख्या कमी झाली, तरी ती समाधानकारक नाही, जोपर्यंत एकही बळी जाणार नाही, अशी परिस्थिती तयार होत नाही तोपर्यंत सरकार व सुरक्षायंत्रणा स्वस्थ बसणार नाही. दहशतवादाचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल, असे केंद्रीयगृहमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, पुंछ-राजौरीमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनचा रविवारी १४ वा दिवस होता. रविवारी या ऑपरेशनदरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. तर एक दहशतवादी ठार झाला. तसेच चकमकीदरम्यान एका नागरिकालाही गोळी लागल्याने त्याचा बळी गेला आहे.

leave a reply