जम्मू-काश्मीरमध्ये ‘पुलवामा’सारख्या हल्ल्याचा कट उधळला

- ५२ किलो स्फोटके जप्त

श्रीनगर – लष्करप्रमुख जनरल मनोज मुंकूद नरवणे जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच श्रीनगर-जम्मू महामार्गावरनजीक तब्बल ५२ किलो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. यामुळे आणखी एक पुलवामा घडविण्याचा कट उधळला गेला आहे. सहा महिन्यापूर्वीही असाच कट सुरक्षादलांनी उधळून लावला होता.

कट उधळला

गुरुवारी जम्मू आणि काश्मीरच्या गडिकालच्या कारेवार भागात सुरक्षादलांना शोधमोहिमेदरम्यान वॉटर टँकमध्ये ५२ किलो स्फोटके आढळली. प्रत्येकी १२५ ग्रँमची ४१६ पाकिटस् या टँकमध्ये लपविण्यात आली होती. दुसऱ्या एका टँकमध्ये ५० डिटोनेटर्स जप्त केल्याचे लष्कराने म्हटले आहे. पकडण्यात आलेली स्फोटके ‘सुपर ९०’ प्रकारातील आहेत, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या ठिकाणापासून गुरुवारी स्फोटके सापडलेले ठिकाण केवळ नऊ किलोमीटर अंतरावर आहे. याआधी सहा महिन्यांपूर्वी पुलवामाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळली होती. सुरक्षादलाला संशय आल्यानंतर या वाहनाचा थरारक पाठलाग करण्यात आला. त्यामुळे एका निर्जन ठिकाणी दहशतवादी हे स्फोटकांनी भरलेले वाहन सोडून पसार झाले होते. या वाहनात ४५ किलो स्फोटके होती. ही स्फोटके आयईडीशी जोडण्यात आली होती. सुरक्षादलांनी हे वाहनच उडवून ही स्फोटके नष्ट केली होती.

कट उधळलागेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत आहेत. गुरुवारीही सुरक्षादलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार केले. या वर्षात सुरक्षादलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये १७७ दहशतवाद्यांना ठार केल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले.

सुरक्षा दलाच्या आक्रमक कारवायांमुळेच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पण सुरक्षा दलाच्या सतकर्तमुळे हल्ल्यांचे कट उधळले जात आहेत.

दरम्यान लष्करप्रमुख जनरल नरवणे जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर असून नियंत्रणरेषेला भेट देऊन त्यांनी युद्धसज्जतेचा आढावा घेतला. तसेच प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांच्या धैर्याचे जनरल नरवणे यांनी कौतुक केले. तसेच नियंत्रणरेषेवर जवानांकडून वापरल्या जाणाऱ्या परिणामकारक तंत्रज्ञानाची जनरल नरवणे यांनी विशेष दखल घेतली.

leave a reply