चीनला रोखण्यासाठी जपान तैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करणार

क्षेपणास्त्रे तैनात

टोकिओ – ईस्ट चायना सी क्षेत्रातील चीनची वाढती लष्करी आक्रमकता रोखण्यासाठी आणि आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी जपान तैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. पुढच्या वर्षी ही तैनाती पूर्ण होईल, असा दावा केला जातो. दोन आठवड्यांपूर्वी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने व्हिडिओद्वारे जपानवर अणुबॉम्बचे हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, तैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करून जपान चीनला संदेश देत आहे.

जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना या तैनातीची माहिती दिली होती. जपानच्या आग्नेयकडील द्विपसमुहांवर विमानभेदी आणि विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रे तैनात करणार असल्याचे संरक्षणमंत्री किशी म्हणाले होते. तैवानच्या ‘ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळा’पासून अवघ्या ३०६ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘इशिगाकी’ बेटावर या क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्या जातील. २०२२ सालापर्यंत या दोन्ही क्षेपणास्त्र यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केल्या जातील, असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

विमानभेदी आणि विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांच्या युनिटबरोबर जपानच्या ‘सेल्फ डिफेन्स फोर्सेस-एसडीएफ’चे पाचशे ते सहाशे जवान तैनात असतील. २०१७ साली पंतप्रधान ऍबे शिंजो यांच्या कार्यकाळातच या तैनातीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या, असा दावा केला जातो. इशिगाकी बेट जपानच्या सेंकाकू द्विपसमुहाच्या हद्दीत येतो. त्यामुळे तैवानजवळ असली तरी जपानच्या क्षेपणास्त्रांची ही तैनाती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत बसणारी असल्याचे सांगितले जाते.

क्षेपणास्त्रे तैनातइशिगाकी बेटावरील या तैनातीच्या आधीच अमामी-ओशिमा, ओकिनावा आणि मियाको या तीन द्विपसमुहांवर जपानच्या क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात आहेत. येथे पॅट्रियॉट ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. त्यामुळे इशिगाकी बेटावरही पॅट्रियॉटची तैनाती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय जपानचे संरक्षण मंत्रालय २०२३ सालापर्यंत यानागुनी बेटावर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट तैनात करण्याची योजना आखत आहे. तर मागेशिमा बेटावर तैवानच्या लष्कराचे तळ उभारण्यावरही विचार करीत असल्याचा दावा केला जातो.

ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी दादागिरीविरोधात जपान ही सर्व तैनाती करीत असल्याचे स्पष्ट आहे. गेल्या काही महिन्यांपासून जपानने तैवानची लोकशाही आणि सार्वभौमत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. दहा दिवसांपूर्वी जपानचे माजी पंतप्रधान ऍबे शिंजो यांनी तैवानबरोबरच्या त्रिपक्षीय बैठकीत चीनवर टीका केली होती. हॉंगकॉंगप्रमाणे तैवानमधील लोकशाही चिरडण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जपानच्या माजी पंतप्रधानांनी केला होता.

तर त्याआधी जपानचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व उपसंरक्षणमंत्र्यांनी तैवानच्या क्षेत्रातील स्थैर्य जपान व आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून चीनच्या लष्करी आक्रमकतेला लक्ष्य केले होते. तसेच तैवानच्या सुरक्षेसाठी लोकशाहीवादी देशांनी एकत्र येण्याचे आवाहन जपानने केले होते. पण तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचा दावा करणार्‍या चीनने या मुद्यावर जपानला धमकावले होते.

चीनच्या ‘कम्युनिस्ट पार्टी’ने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून जपानवर अणुबॉम्बचे हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. चिनी सोशल मीडियामध्ये या व्हिडिओला जोरदार प्रसिद्धी मिळाली होती. पण जपानवर अणुबॉम्बचा हल्ला चढविला तर शेजारी असणार्‍या चीनला देखील याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, असे सांगून काही विश्‍लेषकांनी चीन फक्त दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे लक्षात आणून दिले. या पार्श्‍वभूमीवर, तैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करून जपान चीनला आपल्या कृतीने उत्तर दिले आहे.

leave a reply