जपानचा देशव्यापी सराव

- चीनने जपानला धमकावले

देशव्यापी सरावटोकिओ – जपानच्या संरक्षणदलाने देशव्यापी युद्धसराव सुरू केला. शीतयुद्धानंतर अर्थात जवळपास ३० वर्षानंतर पहिल्यांदाच जपानने असा देशव्यापी युद्धसराव सुरू केल्यामुळे चीनची बेचैनी वाढली आहे. येत्या काळात चीनबरोबर युद्ध भडकलेच तर जपानला विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी चीनच्या सरकारी मुखपत्राने दिली.

जपानच्या ‘ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्सेस-जीडिएसएफ’ने बुधवारपासून देशव्यापी युद्धसरावाची घोषणा केली. याआधी १९९३ साली असा सराव पार पडला होता. यंदाचा हा सराव नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे. या सरावात जपानच्या तीनही दलातील सुमारे एक लाख जवान, २० हजार लष्करी वाहने, १२० लढाऊ विमाने सहभागी होतील. जपानच्या होकाईदो, तोहोकू, क्युशू, शिकोकू या प्रांतांबरोबरच नान्सी बेटावर देखील हा सराव पार पडेल.

लष्करी साहित्याची ने-आण, रणगाड्यांची तातडीची तैनाती त्याचबरोबर खाजगी वाहने, ट्रक्स, बोटी आणि रेल्वेतून लष्कराची वाहतूक हा या सरावाचा भाग असेल. जपानवर हल्ला झालाच तर अत्यावश्यक सेवांचा वापर करण्याची तयारी या सरावातून केली जाईल, असे जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी म्हटले आहे.

जपानच्या या देशव्यापी युद्धसरावाने चीनची झोप उडाली आहे. हा सराव म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारा असल्याचा आरोप चिनी विश्‍लेषक करू लागले आहेत. जपानचे सुगा यांचे सरकार आपल्या जनतेला सेंकाकू आणि तैवानबाबत भ्रमात ठेवत असल्याचा आरोप चीनच्या मुखपत्राने ठेवला. अमेरिकेच्या साथीने जपानने युद्ध पुकारले तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील, अशी धमकी चीनच्या मुखत्राने दिली.

leave a reply