दहशतवादविरोधी युद्धात ‘जर-तर’ची भाषा उपयोगी नाही

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

‘जर-तर’ची भाषानवी दिल्ली – दहशतवादाचा सामना करताना जर-तर’ची भाषा तसेच दहशतवाद्यांमध्ये बरे आणि वाईट असा फरक करता येणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बजावले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेच्या व्हर्च्युल बैठकीत बोलताना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी थेट नामोल्लेख न करता दहशतवाद्यांची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानवर शरसंधान केले. दहशतवाद निखंदून टाकायचा असेल तर प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. कुठल्याही प्रकारे दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही, यावर सर्वच देशांची एकवाक्यता असणे आवश्यक आहे, असे जयशंकर म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या एका व्हर्च्युअल परिषदेला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दहशतवादाच्या बाबत कठोर भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता मांडली. ‘‘दहशतवादाच्या विरोधातील युद्धात ‘जर-तर’ची भाषा केली जाऊ शकत नाही. तसेच दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पीपणा दाखविता येणार नाही. अशा स्वरुपाचे प्रयत्न करून चांगले आणि वाईट दहशतवाद्यांमध्ये फरक करणार्‍यांचा स्वतःचा अजेंडा असतो. अशारितीने दहशतवाद्यांचा बचाव करणारे देखील या दहशतवाद्यांइतकेच अपराधी ठरतात’’, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला थेट नामोल्लेख न करता लक्ष्य केले.

दहशतवाद्यांचा बचाव तसेच समर्थन करण्याची ही अपप्रवृत्ती कट्टरपंथीयांना बळ देते व इतर समुदायांमध्ये दहशत आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करते, याकडेही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्ष वेधले. काही देश दहशतवाद्यांना सर्वतोपरी सहाय्य करीत आहे, त्यांना निधी उभारून देत आहेत. तर अशा देशांचा बचाव करण्याचे धोरण काही देशांनी स्वीकारलेले आहे, असे सांगून जयशंकर यांनी पाकिस्तानबरोबर चीनलाही लक्ष्य केले. याआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची पाकिस्तानातील दहशतवाद्यांवरील कारवाई चीनने नकाराधिकार वापरून टाळली होती. त्याचा संदर्भ जयशंकर यांच्या विधानातून दिला जात आहे.

दरम्यान, भारत दहशतवाद्यांची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानवर कठोर कारवाईची भाषा करीत असताना, पाकिस्तानने मात्र भारतच दहशतवादाचा वापर करीत असल्याचा कांगावा सुरू केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आपल्या देशात दहशतवादी कारवाया करून अस्थैर्य माजवित असल्याचा आरोप एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना तशी खात्री असल्याचे इम्रान?खान यांनी म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या तथाकथित दहशतवादाचे पुरावे संयुक्त राष्ट्रसंघासमोर सादर केले होते. मात्र याला कुणीही किंमत दिलेली नाही, अशी टीका पाकिस्तानी माध्यमांकडूनच आपल्या सरकारवर केली जात आहे.

leave a reply