सिरियाच्या ऊर्जा प्रकल्पातून मोठी तेलगळती

- तुर्की व सायप्रसच्या यंत्रणा अलर्टवर

दमास्कस – सिरियाच्या ऊर्जा प्रकल्पातून हजारो बॅरल्स तेलाची गळती झाली असून तेलाचा तवंग भूमध्य समुद्रात पसरू लागला आहे. तुर्की आणि सायप्रस या शेजारी देशांनी आपल्या यंत्रणांना अलर्टवर ठेवले. तर युरोपिय महासंघानेही सिरियातील या तेलगळतीवर चिंता व्यक्त केली. यामुळे सागरी संपत्ती त्याचबरोबर सुरक्षाही धोक्यात आल्याचे महासंघाने म्हटले आहे. या तेलगळतीमुळे सिरियाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित होत आहे.

गेल्या आठवड्यात 23 ऑगस्ट रोजी सिरियाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर असलेल्या बनियास औष्णिक ऊर्जा प्रकल्पात तेलगळती झाल्याची बातमी समोर आली होती. पण ही तेलगळती छोटी असल्याचे सांगून सिरियन यंत्रणांनी स्पंज आणि तुटपूंजी साधने रवाना केली होती. पण तेलगळती मोठी असून समुद्रात पसरलेल्या तेलाचा तवंग स्पंज आणि रबरी नळ्यांनी रोखता येणार नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी बनियास प्रकल्प व या तेलगळतीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाल्यानंतर याची तीव्रता उघड झाली. सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्रात म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या आकाराचा तवंग पसरल्याचे अमेरिकी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तर सिरियन प्रकल्पातून किमान 20 हजार बॅरल्स इतकी तेलगळती झाल्याचा अंदाज सायप्रसच्या अधिकाऱ्यांनी केला. या तेलाचा तवंग सायप्रसच्या दिशेने येत असल्याची भीती व्यक्त केली जात होती.

सायप्रसच्या किनारपट्टीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हा तवंग पोहोचल्याचे बोलले जात होते. पण भूमध्य समुद्रातील लाटांच्या प्रवाहाबरोबर हा तवंग तुर्कीच्या दिशेने सरकत असल्याचा दावा केला जातो. यामुळे तुर्कीच्या यंत्रणा अलर्टवर गेल्या आहेत. तेलगळतीचा बंदोबस्त करणारी दोन जहाजे तुर्कीने भूमध्य समुद्रात रवाना केली आहेत.

हजारो बॅरल्सच्या या तेलगळतीवर युरोपिय महासंघाने चिंता व्यक्त केली आहे. भूमध्य समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात तेलगळती झाल्यामुळे या सागरी क्षेत्राशी संबंधित सर्वच देश प्रभावित झाल्याचे महासंघाने म्हटले आहे. तर पुढील पंधरा वर्षे याचे परिणाम पर्यावरणावर होतील, असा दावा पर्यावरणवादी संघटना करीत आहेत. तेलगळतीचा अंदाज घेण्यात यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे सिरियावर टीका होत आहे. पण यानिमित्ताने सिरियन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

leave a reply