दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे पाकिस्तानचे कारस्थान हाणून पाडू

- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

नवी दिल्ली/श्रीनगर – पाकिस्तान हिवाळ्यापूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी आणि शस्त्रे घुसविण्याच्या तयारीत आहे. मात्र पाकिस्तानचे सारे मनसुबे उधळून लावले जातील. यामध्ये त्यांना यश मिळणार नाही, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी बजावले आहे. बुधवारी पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅट) नियंत्रण रेषा ओलांडून हल्ला करण्याचे कारस्थान आखले होते. मात्र हे कारस्थान सतर्क भारतीय जवानांनी उधळून लावले. पाकिस्तानच्या ‘बॅट’ पथकामध्ये सामिल पाकिस्तानी कमांडो आणि दहशतवाद्यांना आपला जीव वाचवून पाळावे लागले होते. यापार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

पाकिस्तानचे कारस्थान

पाकिस्तान आपली कुटील कारस्थाने सोडण्यास तयार नसून यावेळी हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरु होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. मात्र पाकिस्तानचे नियंत्रण रेषेवरील घुसखोरीचे प्रयत्न वारंवार उधळण्यात येत आहेत. यावरून भारताची दहशतवादविरोधी आणि घुसखोरीविरोधी मोर्चेबांधणी मजबूत असल्याचे अधोरेखित होते, असे जनरल नरवणे म्हणाले. २४ सप्टेंबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत १७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये तीन परदेशी दहशतवादी होते. याकडे जनरल नरवणे यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, बुधवारी लष्कराने सीमेपलीकडे सुमारे २५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती मेजर जनरल अमरदीप सिंग औजला यांनी दिली होती. त्यांचे हे हल्ले उधळण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे मेजर जनरल औजला म्हणाले होते. याशिवाय तंगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या ‘बॅट’चा हल्ल्याचा प्रयत्नही उधळण्यात आला. नियंत्रण रेषेवरजवळ ३ ते ४ घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर जोरदार कारवाई करीत भारतीय सैनिकांनी या दहशतवाद्यांना पळ काढण्यास भाग पाडले.

leave a reply