‘कंटेन्मेंट झोन’मध्ये ३० जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार

- 'कंटेन्मेंट' क्षेत्राबाहेर टप्प्या टप्प्याने सारे काही सुरु होईल

नवी दिल्ली – देशात ‘लॉकडाऊन’चा पाचवा टप्पा घोषित करण्यात आला आहे. शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘लॉकडाऊनच्या या पाचव्या टप्प्याची घोषणा केली. यानुसार देशात ‘कंटेन्मेंट झोन’ सोडून इतर भागात लॉकडाऊन मागे घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. ‘कंटेन्मेंट’ क्षेत्राबाहेर सारे काही पूर्वीप्रमाणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘कंटेन्मेंट’ क्षेत्राबाहेर धार्मिक स्थळे, हॉटेल्स, मॉलही सुरु होणार आहेत. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवासावरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत.

Containment Zones lockdownदेशात २५ मार्च पासून सुरु झालेल्या ‘लॉकडाऊन’मधून आता देशातील बराच मोठा भाग मुक्त होऊ शकतो. कोरोनाव्हायरसमुळे कराव्या लागलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे देशातील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढाईही सुरु राहावी आणि अर्थचक्रही व्यवस्थित चालावे यासाठी चौथ्या टप्पातच केंद्र सरकारने बरेच नियम शिथिल केले होते. उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आर्थिक हालचाली सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले होते. आता पाचव्या टप्यात ‘कंटेन्मेंट’ झोन वगळता इतरत्र ‘लॉकडाऊन’ मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंर्भातील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

‘कंटेन्मेंट’ क्षेत्राबाहेर लॉकडाऊन हटणार असला, तरी येथे साऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु केल्या जातील. तसेच येथे कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणे लॉकडाऊनमुक्त भागातही बंधनकारक असेल. ६० वर्षावरील वृद्ध आणि १० वर्षांखालील मुले यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लग्न आणि अंतिमविधीसाठी उपस्थितीचे नियम पूर्वी प्रमाणेच कायम असणार आहेत.
‘कंटेन्मेंट’ क्षेत्राबाहेर ८ जून पासून पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, मॉल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण कार्यक्रम आयोजनावरील बंदी कायम असेल. तसेच या ‘कंटेन्मेंट’ क्षेत्राबाहेरही शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था इतक्यात सुरु केल्या जाणार नाहीत. दुसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात या बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तसेच आंतराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो रेल्वे, चित्रपटगृह, जिम, स्वीमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार आणि ऑडीटोरियम सुरु करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्याआधी केंद्र सरकरकडून याबाबत आढावा घेतला जाईल, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

‘कंटेन्मेंट’ अर्थात कोरोना रुग्ण सापडल्याने प्रतिबंधीत करण्यात आलेल्या भागांमध्ये ‘लॉकडाऊन’ कायम ठेवण्यात राहणार आहे. या भागात टप्प्या टप्प्याने नियम शिथिल केले जातील. मात्र ही बाब परिस्थतीवर अवलंबून असेल. गृहमंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे कोणत्या सवलती द्यायच्या याचा अंतिम निर्णयही राज्यांनाच घ्यायचा आहे.

leave a reply