इराणच्या गॅस स्टेशन्सवर मोठा सायबर हल्ला

तेहरान – मंगळवारी इराणमधील गॅस स्टेशन्सवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला. यामुळे इराणमधील गॅस स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या सायबर हल्ल्यांची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. पण अशाप्रकारच्या सायबर हल्ल्यांसाठी इराणने याआधी इस्रायलला जबाबदार धरले होते.

इराणच्या गॅस स्टेशन्सवर मोठा सायबर हल्लाइराणच्या सरकारने आपल्या जनतेसाठी सवलतींच्या दरात इंधन व नैसर्गिक वायू उपलब्ध करून दिले असून यासाठी वाहनचालकांना डिजिटल कार्ड पुरविले आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधानंतर इराणी जनता या सवलतींचा बर्‍याच प्रमाणात वापर करीत असल्याचे बोलले जाते.

पण मंगळवारी गॅस स्टेशन्सवर मोटारी घेऊन आलेल्या इराणी जनतेचे डिजिटल कार्ड हॅक झाले. मशिनवर कार्डचा वापर होताच, ‘सायबरऍटक ६४४११’ असा संदेश येत होता. राजधानी तेहरानपासून इराणमधील बहुतांश सर्वच गॅस स्टेशन्सवर अशीच परिस्थिती होती. तर गॅस स्टेशन्सवरील मोठ्या डिजिटल बोर्डवर ‘खामेनी! व्हेअर इज् दी गॅस?’ तसेच ‘फ्री गॅस इन जामरान गॅस स्टेशन’, असे संदेश झळकत होते.

हा सायबर हल्ला असल्याची माहिती इराण सरकारच्या सूत्रांनी दिली. यानंतर इराणमधील संबंधित अधिकार्‍यांची तातडीची बैठक पार पडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गॅस स्टेशन्सवर प्रसिद्ध झालेल्या संदेशातील पाच आकडी नंबर हा इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा हॉटलाईन संपर्क असल्याचा दावा केला जातो.

महिन्याभरापूर्वी इराणच्या रेल्वेलाईनवर सायबर हल्ला झाला होता. त्यावेळी रेल्वे स्टेशन्सवरील डिजिटल फलकांवर देखील सदर पाच आकडी नंबर प्रसिद्ध झाला होता. यामागे इस्रायली हॅकर्स असल्याचा आरोप इराणने केला होता.

leave a reply