भारताला सुपरपॉवर बनवायचे आहे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा संदेश

नवी दिल्ली – ‘आपल्याला भारताला सुपरपॉवर बनवायचे आहे. भारतामध्ये ती क्षमता आहे. मात्र त्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि उद्योगक्षेत्रात फार मोठी प्रगती करावी लागेल’, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. रांची येथील ‘आयआयएम’च्या दिक्षांत समारोहाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी हा संदेश दिला. एके काळी वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात भारत पाश्‍चिमात्य देशांपेक्षा कितीतरी पुढारलेला होता, याची जाणीव राजनाथ सिंग यांनी यावेळी करून दिली. पृथ्वी वर्तुळाकार आहे. ती स्वतःभोवती प्रदक्षिणा करते, हे भारताच्या आर्यभट्टांनी जर्मनीचा खगोलशास्त्रज्ञ कोपर्निकसच्या हजार वर्ष आधीच सांगितले होते, असे सांगून राजनाथ सिंग यांनी भारत विज्ञानाच्या क्षेत्रात खूप पुढे होता, याची आठवण करून दिली. १२ व्या शतकातील भास्कराचार्य यांनी ग्रहांबाबत मौलिक संशोधन केले होते. पुढे याच संशोधनाचा बहुमान जर्मन शास्त्रज्ञ केपलर यांना मिळाला. भास्कराचार्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता, ते देखील हा सिद्धांत जगासमोर मांडणार्‍या न्यूटनच्या जन्माच्याही पाचशे वर्ष आधी, असे राजनाथ सिंग म्हणाले.

सुपरपॉवर

विज्ञानक्षेत्रातील भारताने केलेली प्रगती फार मोठी आहे. त्याची जंत्रीच सादर करता येईल. तसेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन व्यवस्था या आघाड्यांवरही भारत इतरांपेक्षा खूपच पुढे होता. नवा भारत घडवित असताना, आपल्या सर्वांना या गौरवशाली इतिहासाची जाणीव असलीच पाहिजे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. आपल्याला भारताला पुन्हा सुपरपॉवर बनवायचे आहे. ती क्षमता भारतामध्ये आहे. मात्र त्यासाठी देशाला शिक्षण, आरोग्य आणि उद्योगक्षेत्रात फार मोठी प्रगती करावी लागेल. भारताच्या क्षमतेचा अद्याप संपूर्ण वापर झालेला नाही, याचीही जाणीव राजनाथ सिंग यांनी करून दिली.

भारताच्या सर्वच राज्यांचा विकास झाल्याखेरीज या देशाकडे असलेल्या क्षमतेचा संपूर्ण वापर शक्यच नाही. देशाच्या युवावर्गाकडे कुठल्याही आव्हानाचा सामना करण्याची क्षमता आहे. नवनवीन संकल्पना, संशोधन यांचा वापर करून या आव्हानाचे रुपांतर संधीत करण्याची अद्भूत क्षमता देशाच्या तरुणांमध्ये आहे. आधुनिक शिक्षण घेत असताना, आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासापासून प्रेरणा घेण्यात काहीच वावगे नाही. वैज्ञानिकतेची कास धरत असताना, परमेश्‍वरावर अविश्‍वास दाखविण्याची काहीच गरज नाही. परमेश्‍वराचा विचार केल्याखेरीज कुठलेही शिक्षण शुन्यवत असते, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ रामानुजन यांनी म्हटले होते, याचीही आठवण राजनाथ सिंग यांनी करून दिली.

कुठलेही यश अंतिम नसते आणि कुठलेही अपयश निर्णायक असू शकत नाही, असा विचार यावेळी राजनाथ सिंग यांनी मांडला. त्याचवेळी देशाच्या संरक्षणासाठी योगदान देणार्‍या महान शास्त्रज्ञांचाही यावेळी संरक्षणमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या देशाला शास्त्रज्ञांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. यामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, बोधियान, चरक, सुश्रूत, नागार्जुन ते सवाई जयसिंग यांचा समावेश होते, असे राजनाथ सिंग म्हणाले.

leave a reply