सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील

- संयुक्त राष्ट्रसंघाला भारताचा इशारा

संयुक्त राष्ट्रसंघ – अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर, तालिबानचे दहशतवादी आता पाकिस्तानात कट्टरवादी राजवट प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानच्या नेत्यांनी तसे इशारेही दिले असून तालिबानचाच भाग असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ने यासाठी दहशतवादी कारवायाही सुरू केल्या आहेत. यामुळे सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा भयंकर धोका जगासमोर खडा ठाकला आहे. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘कॉन्फरन्स ऑन डिसार्मामेंट-सीडी’मध्ये हा मुद्दा उपस्थित करून यावर गंभीर चिंता व्यक्त केली.

सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील - संयुक्त राष्ट्रसंघाला भारताचा इशाराअमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे तालिबानच्या हाती पडतील व ती सार्‍या जगासाठी भयंकर बाब ठरेल, असा इशारा नुकताच दिला होता. अमेरिकेतील माजी लष्करी व गुप्तचर अधिकारी तसेच अभ्यासक आणि मुत्सद्दी वारंवार हा धोका अधोरेखित करीत आले आहेत. दहशतवादाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनलेल्या पाकिस्तानातील अण्वस्त्रे दहशतवाद्यांपासून सुरक्षित राहू शकणार नाहीत, दहशतवादी ही अण्वस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भीती अमेरिकेने व्यक्त केली होती. पण तालिबानने अफगाणिस्ताचा ताबा घेतल्यानंतर हा धोका अनेकपटींनी वाढला आहे.

या पार्श्‍वभूमीवर, सीडीने आयोजित केलेल्या ‘मेजर्स टू प्रिव्हेंट टेररिस्ट फ्रॉम अक्वायरिंग वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ या विषयावरील परिसंवादात भारताचे राजदूत पंकज शर्मा यांनी देशाची चिंता व्यक्त केली. सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे व त्यांच्या प्रक्षेपणांची व्यवस्था या दोन्ही गोष्टी दहशतवाद्यांच्या हाती पडू शकतील. यापासून जागतिक शांतता व सुरक्षेला भयंकर धोका निर्माण झालेला आहे, याची जाणीव राजदूत पंकज शर्मा यांनी करून दिली. या भयंकर धोक्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वच सदस्यदेशांनी एकजूट करणे अत्यावश्यक ठरते, असे आवाहन भारताच्या राजदूतांनी केले.

सामुदायिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्यासारखी दुसरी महाभयंकर बाब असूच शकत नाही. म्हणूनच अण्वस्त्र प्रसाराच्या विरोधात ‘प्रोग्राम ऑफ ऍक्शन’ पूर्णपणे लागू करण्यात यावा, अशी भारताची मागणी असल्याचे राजदूत पंकज शर्मा म्हणाले. भारत हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करणे तसेच अण्वस्त्रे नसलेल्या देशांवर अण्वस्त्रांचा प्रयोग न करण्याची भारताची भूमिका आहे, याची आठवण यावेळी पंकज शर्मा यांनी करून दिली. याद्वारे जबाबदार अण्वस्त्रधारी देश असलेला भारत व पाकिस्तानमधली तफावत शर्मा यांनी दाखवून दिली. पाकिस्तानने संवेदनशील अणुतंत्रज्ञान व आण्विक साहित्य याचा काळाबाजार केल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शर्मा यांनी भारताच्या स्वच्छ आण्विक इतिहासाकडे लक्ष वेधल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मानवाधिकार आयोगात पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख करून भारतावर चिखलफेक केली. त्याचा समाचार घेताना, इथले भारताचे प्रतिनिधी अमरनाथ यांनी पाकिस्तान हा दहशतवादाचे समर्थन करणारा देश असल्याचे फटकारले. जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा उल्लेख शहीद असा केला होता, याकडे अमरनाथ यांनी लक्ष वेधले.

मानवाधिकार आयोगासमोर बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारत मानवाधिकारांचे हनन करीत असल्याचा कांगावा केला. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर बोलताना अमरनाथ यांनी पाकिस्तानचा अपप्रचार उत्तर देण्याच्याही लायकीचा नसल्याचा टोला लगावला. जम्मू आणि काश्मीर व लडाख हा भारताचा अविभाज्य भूभाग होता, आहे व यापुढेही राहिल. यामध्ये सध्या पाकिस्तानच्या अवैध ताब्यात असलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे. पाकिस्तानने त्वरित हा भूभाग खाली करावा, अशी मागणी अमरनाथ यांनी केली.

leave a reply