‘मूडीज्’कडून भारताच्या आर्थिक विकासदराच्या अंदाजात सुधारणा

नवी दिल्ली – कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट आणि अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणाच्या पार्श्वभुमीवर जागतिक पतमानांकन संस्था ‘मूडीज्’ भारताच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात बदल केला आहे. पुढील वर्षी भारताचा विकास दर ८.६ टक्क्यांवर जाईल, असा नवा अंदाज ‘मूडीज्’ने व्यक्त केला आहे. याआधी भारत ८.१ टक्के विकासदराने प्रगती करील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच चालू आर्थिक वर्षांत जीडीपी उणे ९.६ टक्के असेल असे याआधी मूडीज् म्हटले होते. मात्र नव्या सुधारित अंदाजात हा दर उणे ८.९ टक्के असेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

'मूडीज्'

गेल्या महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे समोर येत आहे. नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनलॉक नंतर व्यवसायांना सुरुवात झाली असून अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विकास दरात सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) २०२१ साठी ८.६ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्यावर्षी आर्थिक विकास दर ४.८ टक्के होता.

नुकताच मार्किट ग्रुपने जाहीर केलेल्या ‘पर्चेसिंग मॅनेजमेन्ट इंडेक्स’नुसार (पीएमआय) देशातील उत्पादन आणि मागणीत वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ नोंदविण्यात आली. यासह देशातील गुंतवणुकीत वाढ होत असून अर्थव्यवस्थेत होत असलेल्या वाढीचे हे संकेत आहेत. यापार्श्वभूमीवर ‘मूडीज्’चा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

दरम्यान अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असून यांच्यातील संबंध बिघडल्याचा परिणाम व्यापारावर झाला असून जागतिक अर्थव्यवस्थे पुढील हे आव्हान असेल असे अहवालात म्हटले आहे. अर्थव्यवस्था आणि सुरक्षा अशा दोन्ही चिंता अनेक देशांना सतावत आहेत. काही देशांकडून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्यामुळे मूडीजने २०२१ साठी जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

leave a reply