जगभरात कोरोनाव्हायरसचे १५ लाखांहून अधिक रुग्ण

- बळींची संख्या एक लाखाजवळ

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसने जगभरात ९१,८२८ जणांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासात २४०० हून अधिक जणांचा बळी गेला. तर गेल्या चोवीस तासातच जगभरात ७० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून या साथीचे जगभरात एकूण १५,५४,५९० रुग्ण असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. दरम्यान, युरोपात सुमारे तीन हजार जण दगावले आहेत. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ९३८ जणांचा बळी गेला आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीने अमेरिकेत १५,८२४ जण दगावले आहेत. अमेरिकेचा न्यूयॉर्क प्रांत या साथीचे मुख्यकेंद्र ठरत असून या न्यूयॉर्क प्रांतातच साडे सहा हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये कोरोनाव्हायरसचे ११ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,४०,६७९ वर पोहोचली आहे. सध्या या साथीचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहे. तर इटलीनंतर अमेरिकेत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील बळींची संख्या या वेगाने वाढत राहिली तर येत्या दोन दिवसात अमेरिकेत या साथीच्या सर्वाधिक बळींची नोंद होईल, अशी भीती अमेरिकी वृत्तवाहिन्या व्यक्त करीत आहेत.

युरोपिय देशांमधील या साथीचे थैमान अजूनही शमलेले नाही. मंगळवारी कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे फ्रान्समध्ये १४१७ जण दगावले होते. सलग दुसर्‍या दिवशी या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा बळी गेल्यानंतर फ्रान्स युरोपमधील या साथीचे नवे केंद्र ठरत असल्याचे दावे माध्यमांकडून केले जात होते. मात्र गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये या साथीचे ९३८ बळी गेले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये ८३०, स्कॉटलंडमध्ये ७०, वेल्समध्ये ३३ आणि नॉर्दन आयर्लंडमधील पाच जणांचा समावेश आहे. या साथीचा सामना करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स आणि नर्सेसची कमतरता भासत असल्याचे ब्रिटनच्या सरकारने मान्य केले आहे.

ब्रिटनपाठोपाठ फ्रान्समध्ये चोवीस तासात ५४१ जण दगावले. त्याबरोबर फ्रान्समध्ये आतापर्यंत या साथीत दगावलेल्यांची संख्या १०,८६९ वर पोहोचली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमन्यूअल मॅक्रॉन हे येत्या सोमवारी महत्त्वाची घोषणा करणार आहेत. फ्रान्समधील लॉकडाउन तीव्र करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून घेतला जाऊ शकतो, असे माध्यमांचे म्हणणे आहे.

स्पेन आणि इटलीने गेल्या चोवीस तासातील घडामोडींची माहिती उघड केलेली नाही. तसेच आपल्या देशातील परिस्थिती सुधारत असल्याचा दावाही केला आहे. युरोपमध्ये कोरोनाव्हायरसची साथ थैमान घालत असताना, लॉकडाउन मागे घेण्याची मागणी, उद्योगक्षेत्रांकडून केली जात आहे. तसे झाले नाही तर आपल्याला जबर आर्थिक फटका बसेल व रोजगार निर्मिती पूर्णपणे थंड होईल, असा इशारा उद्योगक्षेत्रांकडून दिला जातो. यामुळे कदाचित लॉकडाउन मागे घेणे किंवा काहीप्रमाणात नियम शिथिल करणे, यासारख्या उपाययोजना युरोपिय देशांकडून केल्या जाऊ शकतात, असे काही जणांचे म्हणणे आहे.

मात्र लॉकडाऊन मागे घेतल्यास त्याचे भयंकर परिणाम समोर येतील, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. जगभरातील कोरोनाव्हायरसच्या एकूण बळींपैकी दोन तृतियांश बळी युरोपिय देशांमध्ये गेले असून एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण युरोपमध्ये आहेत. त्यामुळे सध्या तरी युरोपातील कुठल्याही देशाला लॉकडाऊनबाबत असा निर्णय घेणे अवघड असल्याचे चित्र दिसत आहे.

leave a reply