इटलीत एका दिवसात दोन हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी

- युरोपातील निर्वासितांची समस्या चिघळण्याचे संकेत

रोम – इटलीत रविवारी तब्बल दोन हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या वर्षभरात इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे. इटलीतील उजव्या विचारसरणीचे नेते मॅटिओ सॅल्व्हिनी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, इटलीतील लाखो नागरिक संकटात असताना निर्वासितांना थारा दिला जाऊ शकत नाही, असा इशारा दिला आहे. इटलीतील या घुसखोरीवर युरोपियन कमिशननेही चिंता व्यक्त केली असून इतर सदस्य देशांनी इटलीला सहाय्य करावे, असे आवाहन केले आहे.

इटलीत एका दिवसात दोन हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी - युरोपातील निर्वासितांची समस्या चिघळण्याचे संकेतआफ्रिकेत लिबिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान यासह ‘साहेल रिजन’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या पश्‍चिम व मध्य आफ्रिकी देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराला कंटाळलेले आफ्रिकन नागरिक युरोपात जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युरोपात स्थलांतर किंवा मृत्यू या दोन्ही पर्यायांसाठी हे नागरिक तयार असून, त्यामुळेच गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा निर्वासितांचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली आहे. इटली व स्पेन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्वासित अवैधरित्या दाखल होत असून नवी घटना त्याला दुजोरा देणारी ठरते.

इटलीच्या लॅम्पेड्युसा आयलंडवर रविवारी तब्बल दोन हजारांहून अधिक निर्वासित बोटींमधून दाखल झाले. काही निर्वासित स्वयंसेवी संघटनांनी व्यवस्था केलेल्या बोटींमधून तर इतर गुन्हेगारी टोळ्यांच्या सहाय्याने दाखल झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. यावेळी इटालियन यंत्रणांनी कारवाई करून जवळपास नऊ बोटींसह शेकडो अवैध निर्वासितांना रोखण्यात यश मिळविल्याचेही सांगण्यात येते. मात्र तरीही एकाच दिवसात दोन हजारांहून अधिक निर्वासित दाखल होणे ही घटना, युरोपातील निर्वासितांची समस्या पुन्हा चिघळण्यास सुरुवात झाल्याचे दाखवून देत आहे.इटलीत एका दिवसात दोन हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी - युरोपातील निर्वासितांची समस्या चिघळण्याचे संकेत

इटलीत गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत जवळपास ११ हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरी केली आहे. इटलीचे सरकार व प्रशासन कोरोना साथीशी संघर्ष करीत असताना घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर इटलीतील उजव्या गटाच्या राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘नॉर्दर्न लीग’चे प्रमुख मॅटिओ सॅल्व्हिनी यांनी निर्वासितांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली.

इटलीत एका दिवसात दोन हजारांहून अधिक निर्वासितांची घुसखोरी - युरोपातील निर्वासितांची समस्या चिघळण्याचे संकेत‘लाखो इटालियन नागरिक कठीण परिस्थितीशी झुंजत असताना, इटली अवैध निर्वासितांना थारा देऊ शकत नाही. इटलीच्या सरकारने फ्रान्ससह इतर देशांनी निर्वासितांबाबत राबविलेले निर्णय लागू करावेत’, असे सॅल्व्हिनी यांनी बजावले. यापूर्वी इटलीचे अंतर्गत सुरक्षामंत्री म्हणून काम करताना सॅल्व्हिनी यांनी निर्वासितांना घेऊन येणार्‍या बोटी तसेच गुन्हेगारी टोळ्यांविरोधात आक्रमक कारवाई केली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर ही कारवाई थंडावली असून रविवारी झालेली घुसखोरी त्याचाच परिणाम असल्याचे दिसते.

गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाने युरोपात घुसणार्‍या आफ्रिकन निर्वासितांची समस्या भीषण बनेल, असा गंभीर इशारा दिला होता. हा इशारा व इटलीत झालेली निर्वासितांची घुसखोरी यामुळे येणार्‍या काळात युरोपातील निर्वासितांची समस्या पुन्हा एकदा चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply