म्यानमारी लष्कराच्या कारवाईत सात निदर्शकांचा बळी

- महिन्याभरातील सर्वात रक्तरंजित दिवस

यंगून – रविवारी म्यानमारच्या लष्कराने निदर्शकांवर केलेल्या अमानुष कारवाईत सात निदर्शकांचा बळी गेला असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यावेळी लष्कराने निदर्शकांवर गोळीबार केल्याचेही उघडकीस आल्यामुळे निदर्शक अधिकच संतापले आहेत. लष्कराच्या या दडपशाहीविरोधात अधिक जोमाने उभारी घेण्याची घोषणा निदर्शकांनी केली आहे. तर ही निदर्शने कठोरपणे दडपली जातील असे सांगून पुढच्या काळात यातील बळींची संख्या वाढू शकते, असे संकेत लोकशाहीवादी सरकार उलथून टाकणार्‍या म्यानमारच्या जुंटा लष्करी राजवटीने दिले आहेत.

काही तासांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघातील म्यानमारचे राजदूत ‘क्या मो तून’ यांनी सुरक्षा परिषदेत बोलताना, म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करा, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर आपल्या देशातील लोकशाही सरकार उलथणार्‍या जुंटा लष्करी राजवटीवर कठोर कारवाई करण्याची मागणी क्या मो यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजदूतानेच ही मागणी केल्यामुळे खवळलेल्या जुंटा राजवटीने निदर्शकांवरील कारवाई अधिक तीव्र केली. आपला देश हा युद्धभूमी बनल्यायाची चिंता एका म्यानमारी नागरिकाने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

म्यानमारच्या लष्कराने रविवारी यंगून, दावेई आणि मंडाले या प्रमुख शहरांमध्ये निदर्शकांवर कारवाई केली. यावेळी जुंटा लष्कराने निदर्शकांवर स्टेन ग्रेनेड्सचा वापर केला. पण निदर्शकांमध्ये भीती निर्माण करण्यात अपयशी ठरल्यानंतर लष्कराने निदर्शकांवर गोळीबार केला. तर काही ठिकाणी शिक्षकांच्या निदर्शनांविरोधात पोलीस दलांचाही वापर केला. तीन शहरांमधील या कारवाईत सात निदर्शकांचा बळी गेला असून महिन्याभरातील बळींची संख्या 18 वर पोहोचली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून म्यानमारच्या लष्कराने बळाचा वापर सुरू केल्यानंतरही निदर्शक माघार घ्यायला तयार नाहीत. लष्कराच्या कैदेत असलेल्या आँग सॅन स्यू की यांच्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी जुंटा राजवटीविरोधात अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी शेजारी देश भारत, चीन तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहाय्य घेणार असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात म्यानमार आणि चीनमध्ये ‘अनरजिस्टर्ड’ विमानांच्या फेर्‍या सुरू असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियातील अभ्यासगटाने केला आहे. प्रत्येक रात्री चीनमधून अज्ञात साहित्य घेऊन विमाने म्यानमारमध्ये दाखल होत असल्याची चिंता या अभ्यासगटाने व्यक्त केली आहे. म्यानमारच्या लष्करानेच परदेशी विमानांच्या प्रवासावर बंदी टाकूनही चीनमधून ही विमाने म्यानामारमध्ये दाखल होत आहेत, हे ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने लक्षात आणून दिले आहे.

leave a reply