‘आयएनएस करंज’ नौदलात सहभागी

‘आयएनएस करंज’

मुंबई – स्कॉर्पियन श्रेणीतील ‘आयएनएस करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली आहे. नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यांनी बुधवारी सकाळी एका कार्यक्रमात औपचारिकरित्या ‘आयएनएस करंज’चा स्वीकार केला. नौदलाच्या ताफ्यात आलेली ही पाणबुडी शत्रूला गुंगारा देण्याची क्षमता असलेली अत्यंत घातक असल्याचे दावे केले जातात. ‘सायलेंट किलर’ अशी ओळख असलेल्या या पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

२०१८ सालच्या जानेवारी माहिन्यात या पाणबुडीचे जलावतरण झाले होते. दोन वर्षांच्या चाचण्यांनंतर ‘आयएनएस करंज’ भारतीय नौदलात सहभागी झाली आहे. फ्रान्सच्या सहकार्याने देशातच उभारण्यात येणार्‍या स्कॉर्पियन पाणबुड्यांमध्ये ‘आयएसएस करंज’चा समावेश केला जातो. ही सर्वात घातक पाणबुडी असून हिचा माग काढणे शत्रूच्या रडरयंत्रणेसाठी अत्यंत अवघड जाते. अगदी शत्रूच्या सागरी हद्दीत देखील या पाणबुडीचा वेध घेणे शत्रूसाठी कठीण असल्याचे मानले जाते. ही वैशिष्ट्ये ‘आयएनएस करंज’ची मारकक्षमता प्रचंड प्रमाणात वाढणारी आहेत.

आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया उपक्रमाचे यश आयएसएस करंज अधोरेखित करीत असल्याचे सांगून नौदलप्रमुख करमबिर सिंग यांनी त्याचे स्वागत केले. त्याचवेळी देशाच्या नौदलासाठी ४० हून अधिक युद्धनौका व पाणबुड्या उभारल्या जात असल्याची माहिती नौदलप्रमुखांनी दिली. यापैकी ४० युद्धनौका व पाणबुड्यांची निर्मिती देशातच केली जात आहे. माझगाव डॉक लिमिटेड यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे, असे अ‍ॅडमिरल करमबिर सिंग पुढे म्हणाले.

याबरोबरच डीआरडीओने विकसित केलेल्या ‘एआयपी’ तंत्रज्ञानाचा उल्लेख करून अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यांनी हे तंत्रज्ञान २०२३ सालापर्यंत भारतीय पाणबुड्यांवर बसविले जाईल, अशी ग्वाही दिली. यामुळे पाणबुड्यांना खोल समुद्रात अधिक काळ राहता येईल, असा दावा नौदलप्रमुखांनी केला. दरम्यान, या पाणबुडीचा स्वीकार करताना नौदलप्रमुख करमबिर सिंग यांच्यासह माजी नौदलप्रमुख व्ही. एस. शेखावत देखील उपस्थित होते.

१९७१ सालच्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या त्यावेळच्या ‘आयएनएस करंज’चे नेतृत्त्व शेखावत यांनी केले होते. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात पाणबुड्यांचा विशेष सहभाग नव्हता. पण दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात, इलेक्ट्रॉनिक क्रांती झाली व पाणबुड्यांमध्ये मोठे अभियांत्रिकी बदल झाले, याकडे शेखावत यांनी लक्ष वेधले. सागरी क्षेत्रातून होणार्‍या आक्रमणापासून आपला बचाव करणे अत्यंत अवघड ठरते. म्हणूनच या आघाडीवर सदैव सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगून शेखावत यांनी पाणबुड्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

leave a reply