चीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक

- राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले

बीजिंग – कोरोना साथीचा उगम असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा साथीचा नवा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. चीनची राजधानी बीजिंगसह पाचहून अनेक प्रांतांमध्ये गेल्या काही दिवसात सुमारे १०० नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर काही प्रांतांमध्ये हवाईसेवा स्थगित करण्यात आली असून शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. या नव्या उद्रेकामुळे चीनच्या ‘झीरो कोव्हिड पॉलिसी’वर पुन्हा एकदा सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

चीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक - राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरात कोरोना साथीचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर पुढील काही महिन्यात लॉकडाऊन, मास टेस्टिंग, मोठ्या हॉस्पिटल्सची उभारणी व स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या लसीच्या जोरावर कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचा दावा चीनच्या सत्ताधारी राजवटीने केला होता. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहानसह इतर शहरांमध्ये पार्टी तसेच इतर कारणांसाठी झालेल्या गर्दीचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते.

आपली साथ नियंत्रणात आणल्याचे दावे करणार्‍या चीनने पाश्‍चात्यांसह इतर देशांकडून कोरोनाविरोधात राबविण्यात येणार्‍या मोहिमेवर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता जवळपास वर्षभरानंतर चीनच्या अनेक प्रांतांमध्ये पुन्हा एकदा कोरोना साथीचा उद्रेक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना चीनच्या सत्ताधारी राजवटीसह स्थानिक यंत्रणांसाठी नवे आव्हान ठरत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील नव्या उद्रेकाचे बहुतांश रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे असून हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे.

काही दिवसांपूर्वी शांघायमधील एका निवृत्त चिनी जोडप्याला कोरोना झाल्याचे उघड झाले. या जोडप्याने पर्यटक म्हणून चीनच्या काही भागांमध्ये प्रवास केल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा चाचण्या करण्यात आल्या. सुरुवातीला त्यातील पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर ही संख्या हळुहळू वाढण्यास सुरुवात झाल्याने चीनच्या प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे.चीनमध्ये कोरोना साथीचा नवा उद्रेक - राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले

राजधानी बीजिंगमध्ये चार रुग्ण आढळणे तसेच शुक्रवारी कोरोनाच्या ३२ रुग्णांची झालेली नोंद चीनच्या धोरणांवर सवाल उपस्थित करणारे ठरले आहे. मात्र तरीही चीनने आपली ‘झीरो कोव्हिड पॉलिसी’ कायम ठेवत मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. उत्तर व वायव्य चीनमधील प्रांतांमध्ये शेकडो विमानांच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून काही शहरांमधील हवाईसेवा स्थगित करण्यात आली आहे. अनेक शाळांनाही बंदीचे निर्देश देण्यात आले असून काही शहरांमध्ये नागरिकांनी बाहेर पडून नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

चीनमध्ये पुढील वर्षी ‘विंटर ऑलिंपिक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनमधील कोरोनाचे नवे उद्रेक कम्युनिस्ट राजवटीच्या निर्णयांवर शंका उपस्थित करीत आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी कम्युनिस्ट राजवटीकडून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे.

leave a reply