कोरोनाच्या साथीचा नवा उद्रेक

जगभरात एका दिवसात सव्वा लाख रुग्ण

बाल्टिमोर –जगभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या साथीने साडे चार हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला. आधीच्या तुलनेत चोवीस तासात गेलेल्या बळींची ही संख्या कमी ठरत असली तरी, या साथीच्या रुग्णांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  या चोवीस तासात जगभरात सव्वा लाखाहून अधिक जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे.  यामुळे या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या साठ लाखांच्याही पुढे पोहोचली आहे.

जगभरात कोरोनाच्या साथीने दगावलेल्यांची संख्या ३,६८,४०९ वर गेल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठ, वर्ल्डोमीटर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिली. यात गेल्या चोवीस तासात बळी गेलेल्या ४,८७२ जणांचा समावेश आहे. यापैकी अमेरिकेत १,१७५ जण या साथीने दगावले असून या देशातील बळींची एकूण संख्या एक लाख चार हजारांच्यापुढे गेली आहे. तर या एका दिवसात ब्राझीलमध्ये १,१२४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. याबरोबर ब्राझीलमध्ये या साथीने २८ हजारांचा बळी घेतला असून ब्राझिलमध्ये स्पेनपेक्षाही अधिक बळींची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी युरोपमध्ये ३७७ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती युरोपिय महासंघाच्या वेबसाईटवर दिली आहे.

सलग दोन दिवस या साथीच्या जगभरातील रुग्णांची संख्या एक लाखाच्या पलिकडे गेली होती. मात्र, शुक्रवारी या साथीने जगभरात अधिकच दहशत निर्माण केली असून तब्बल १,२५,५११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने म्हटले आहे. यापैकी, ब्राझीलमधील २६,९२८ नव्या रुग्णांचा यात समावेश असून सलग दुसऱ्या दिवशी या देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर अमेरिकेत २४,२६६ आणि रशियात ८,९२५ नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या १८,८०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटनसह युरोपातील देशांनी लॉकडाउन मागे घेण्याचे घाई करू नये, असे आवाहन अमेरिका व ब्रिटनमधील काही अनुभवी शास्त्रज्ञ करीत आहेत. लॉकडाउन काढल्यामुळे या साथीचा फैलाव वाढेल, असा इशारा ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

leave a reply