ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा नवा उपप्रकार भारतात सापडला

- मध्य प्रदेश, महाराष्ट्रात ऍलर्ट

डेल्टानवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत काही भागात रुग्णवाढीस कारणीभूत ठरलेल्या एवाय.४.२ हा व्हेरियंट भारतात सापडला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचाच उपप्रकार असलेल्या या व्हेरियंटचे २० रुग्ण आतापर्यंत भारतात आढळल्याच्या बातम्या आहेत. रुग्णांची संख्या कमी असली तरी मूळ डेल्टा व्हेरियंटपेक्षा हा व्हेरियंट अधिक वेगाने पसरू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. यामुळे देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना कोरोनाच्या एव्हाय.४.२ व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

देशात कोरोनाचे लसीकरण वेगाने होत आहे. गेल्या आठवड्यातच देेशात १०० कोटी लसींचे डोस लसीकरण मोहिमेअंतर्गत देण्याचा टप्पा ओलांडण्यात आला होता. देेशात वेगाने होत असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाचे संक्रमण कमी होताना दिसत आहेत. तिसर्‍या लाटेच्या याआधी वर्तवण्यात आलेले अंदाज चुकीचे ठरले आहेत. तरीसुद्धा तिसर्‍या लाटेचा धोका टळला नसून जास्तीत जास्त लसीकरण वेगाने पूर्ण करण्याकडे भर देण्यात येत असताना कोरोनाचा नवा व्हेरियंट भारतात सापडल्याच्या बातम्या आल्या आहेत.

एवाय.४.२ हा डेल्टा व्हेरियंटचाच उपप्रकार असलेला व्हेरियंट सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळला होता. ९ ऑक्टोेबरपर्यंत ब्रिटनमध्ये या व्हेरियंटची लागण झालेले १० टक्के रुग्ण आढळत होते. ब्रिटनच्या काही भागात या व्हेरियंटचे संक्रमण पसरल्याचे लक्षात आले होते. जगातील ३० देशात हा व्हेरियंट आढळला असून मूळ डेल्टा व्हेरियंटपेक्षा त्याचा हा उपप्रकार १५ टक्के वेगाने संक्रमण पसरवू शकतो, असा दावा करण्यात येतो. जर्मन, फ्रान्स, इटली, रशिया, इस्रायलमध्ये या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. जिनोम सिक्वेन्सींगसाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यांमधून भारतात आतापर्यंत २० जणांना याची लागण झाल्याचे लक्षात आले आहे.

यामुळे आता जिनोम सिक्वेन्सींग वाढविण्याची आवश्यकता वर्तविली जाते. सध्या रशिया व आजूबाजूच्या देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. तसेच चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्यावर काही शहरांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला आहे. त्यामुळे भारतात नवी लाट येऊ नये यामुळे दक्षता घेण्यास व सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आव्हान करण्यात येत आहे. अशावेळी एवाय.४.२ व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश केरळमध्ये ऍलर्ट देण्यात आला आहे.

leave a reply