नव्या प्रकाराच्या कोरोनाची दहशत बाळगण्याची आवश्यकता नाही

- नीति आयोगाच्या सदस्यांचा दावा

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा एकही रुग्ण भारतात दूरदूर आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे घाबरण्याचे कारण नसून केवळ सतर्क राहण्याची व काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. वी.के. पॉल यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराचा तयार होणार्‍या लसींवर काहीही परिणाम होणार नाही. थोडक्यात कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलानंतरही या लसी प्रभावी ठरतील, असा दावा पॉल यांनी केला आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरात दहशत आहे. कोरोनाच्या विषाणूत झालेल्या अनुवांशिक बदलामुळे या विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला आहे.

कोरोनाची दहशत

ब्रिटनमध्ये यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात आला. कित्येक देशांनी हा बदललेला कोरोना विषाणू आपल्या देशात येऊ नये यासाठी ब्रिटनमधून येणार्‍या विमानांना स्थगिती दिली आहे. सोमवारी भारतानेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र याआधी उड्डाण झालेल्या विमानातून भारतात पोहोचलेल्या प्रवाशांची विमानतळावर चाचण्या घेण्यात येत असून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. युरोपातून येणार्‍या प्रवाशांबरोबर इतर देशातून येणार्‍या प्रवाशांबाबतही काळजी बाळगण्यात येत आहे. त्यांची ट्रव्हल हिस्ट्री तपासली जात आहे.

ब्रिटनमधून भारतातील विविध विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. अमृतसर विमानतळावर उतरलेले सात प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले. अहमदाबाद विमानळावर उतरलेल्या पाच प्रवाशांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक आहे. दिल्ली विमानतळावरही ब्रिटनमधून आलेले पाच प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. रविवारी रात्री कोलकातामध्ये ब्रिटमधून आलेले दोन प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले होते.

मात्र यामध्ये कोणीही कोरोच्या नव्या प्रकाराने संक्रमित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या नव्या प्रकार धोकादायक आहे. कारण तो अधिक वेगाने फैलावतो. पण त्याचवेळी यामुळे कोण गंभीर झाल्याचे किंवा मृत्यु पावल्याचे समोर आलेले नाही. केवळ या विषाणूचा संक्रमणाचा वेग अफाट आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे किंवा या बदललेल्या कोरोना विषाणूची दहशत बाळगण्याचे कारण नाही. केवळ सतर्कतेचे आवश्यकता आहे, असे निती आयोगाचे डॉ. पॉल म्हणाले. एखाद्या विषाणूत बदल ही सामान्य बाब आहे. कित्येक विषाणूमध्ये ती दिसून येते, असेही पॉल यांनी आधोरेखित केले.

तसेच कोरोनाची लस लहान मुलांना देण्यात येणार नाही, असेही पॉल यांनी स्पष्ट केले. लस देण्याबाबतच्या गाईडलाईन्स आंतरराष्ट्रीय स्टॅडर्डनुसार आखल्या गेल्या आहेत. मोठ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त आढळून आला आहे. तसेच आतापर्यंत लसींच्या ज्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्या १८ वर्षांवरील व्यक्तींवरच घेण्यात आल्याकडे पॉल यांनी लक्ष्य वेधले.

दरम्यान, भारतात गेल्या सात दिवसात दहा लाख नागरिकांमागे १२४ कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. हाच जागतिक दर पाहिल्यास ५८८ इतका आहे. तसेच प्रति दहा लाख व्यक्तींमागे भारतात कोरोनाने दोन मृत्यु होत आहेत. तर जागतिक दर १० मृत्युंचा आहे. यावरून भारतात कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. तसेच देशातील २६ राज्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या १० हजारांपेक्षा कमी असल्याचेही भूषण यांनी अधोरेखित करून सांगितले.

leave a reply