नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला नोटीस

नवी दिल्ली – आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादनांच्या ‘मेड इन कंट्री’ची माहिती न देणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघाडीच्या कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस बजावली आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारने ‘ई-कॉमर्स’ कंपन्यासाठी नवे नियम लागू केले होते. यामध्ये कंपन्यांना बनावट व खराब सामान विकल्यास कडक कारवाईची तरतूद होतीच. याशिवाय कंपन्यांना आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्पादनांच्या शेजारी या उत्पादनाची निर्मिती कोणत्या देशात झाली याची माहितीही ठळकपणे देणे आवश्यक होते. मात्र या कंपन्यांकडून नियमांचे पालन होताना दिसत नसून याबाबत ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला नोटीसभारतात ई-कॉमर्सचा व्यवसाय विस्तारत आहे. या क्षेत्रात भारतात कंपन्यांची संख्या वाढत आहेत. हे पाहता केंद्र सरकारने ३० वर्ष जुन्या जुनाट ग्राहक संरक्षण कायद्यात बदल केले होते. ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने नवी नियमावली तयार करण्यात आली होती. यानुसार उत्पादनाची इत्यंभूत माहिती देणे कायद्याने सक्तीचे करण्यात आले आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ अर्थात हे प्रोडक्ट कुठे बनले हे सुद्धा ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना ‘मेक इन इंडिया‘ इंडिया उत्पादनांची ओळख पटविणे शक्य होईल.

भारतात चिनी उत्पदनांवर बहिष्काराची मोहीम सुरु आहे. भारतीय चिनी बनावटीची किंवा चीनमध्ये तयार झालेली उत्पादने नाकारत आहेत. यापार्श्वभूमीवर ‘चायना मेड’ उत्पादनांची ओळख नीट पटावी म्हणून हा नियम महत्वाचा ठरणार आहे. मात्र ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या या नियमांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यानंतर केंद्रीय ग्राहकव्यवहार, खाद्य आणि वितरण मंत्रालयाने या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवून १५ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच राज्यांनाही सर्व ई-कॉमर्स कंपन्या नियमाने पालन करीत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

leave a reply