युक्रेनच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पात पुन्हा स्फोटाची शक्यता

- शास्त्रज्ञांचा इशारा

किव्ह – तब्बल ३५ वर्षानंतर युक्रेनमधील वादग्रस्त चेर्नोबिल अणुप्रकल्पात पुन्हा एकदा ‘न्यूक्लिअर ब्लास्ट’ होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या अणुप्रकल्पातील एका बंदिस्त भागात असलेल्या अणुइंधनाच्या साठ्यात आपोआप ‘न्यूक्लिअर रिऍक्शन’ सुरू झाल्या असून त्याची परिणिती मोठ्या स्फोटात होऊ शकते, असे ब्रिटीश शास्त्रज्ञ नील हयात यांनी बजावले आहे. यापूर्वी १९८६ साली चेर्नोबिलमध्ये झालेल्या दुर्घटनेत १० हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचे मानले जाते.

युक्रेनच्या चेर्नोबिल अणुप्रकल्पात पुन्हा स्फोटाची शक्यता - शास्त्रज्ञांचा इशारायुक्रेन-बेलारुस सीमेपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या व सध्या बंद अवस्थेत असलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पात अद्यापही हजारो टन अणुकचरा तसेच अणुइंधन पडून आहे. प्रकल्पात जमिनीखाली असणार्‍या भागांमधील ‘३०५/२’ नावाच्या एका बंदिस्त खोलीत मोठ्या प्रमाणात युरेनियमच्या स्वरुपातील अणुइंधन आहे. या इंधनाच्या साठ्यातील न्यूट्रॉन्सची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती यावर लक्ष ठेऊन असणार्‍या संशोधकांनी दिली.

न्यूट्रॉन्सची वाढती संख्या अणुस्फोटासाठी आवश्यक असणार्‍या ‘न्यूक्लिअर फिशन’ प्रक्रियेसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे नजिकच्या काळात चेर्नोबिलमध्ये पुन्हा आण्विक स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे युक्रेनियन वैज्ञानिक मॅक्सिम सॅव्हेलिव यांनी सांगितले. शेफिल्ड युनिव्हर्सिटीतील ब्रिटीश शास्त्रज्ञ नील हयात यांनी चेर्नोबिलच्या बंदिस्त खोलीतील अणुइंधन, पेटविलेल्या लाकडाप्रमाणे धुमसत असल्याचे बजावले आहे.

१९८६ साली झालेल्या दुर्घटनेनंतर चेर्नोबिल अणुप्रकल्पाभोवती ‘न्यू सेफ कन्फाईनमेंट’ नावाचे संरक्षित बांधकाम उभारण्यात आले आहे. या बांधकामामुळे प्रकल्पातील किरणोत्सर्गी पदार्थांची गळती बाहेरच्या भागात होणार नाही, असे सांगण्यात येते. हे बांधकाम प्रकल्पातील अणुइंधनात होणारी ‘रिऍक्शन’ही रोखू शकते, असे मानले जाते. मात्र तरीही ‘३०५/२’मधील न्यूट्रॉन्सची संख्या वाढत असल्याने याकडे लक्ष वेधले गेले आहे.

२६ एप्रिल, १९८६ रोजी तत्कालिन सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातील ‘रिऍक्टर ४’मध्ये मोठ्या प्रमाणात अणुगळती झाली होती. त्यानंतर झालेल्या स्फोटात प्रकल्पातील ५० जणांचा जागीच बळी गेला होता. प्रकल्पातून झालेल्या घातक किरणोत्सर्गामुळे हजारो लोकांचा बळी गेला होता. अपघातातील भयावह गळतीमुळे हजारो किलोमीटर्सचा परिसर रिकामा करणे भाग पडले होते. चेर्नोबिलची ही दुर्घटना जगातील सर्वात मोठे ‘न्यूक्लिअर डिझास्टर’ म्हणून ओळखण्यात येते.

leave a reply