वर्षाअखेरीस आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ नौदलात सहभागी होणार

विशाखापट्टणम – स्वदेशी बनावटीची दुसरी आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतीय नौदलाच्या सेवेत सामील होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आयएनएस अरिघात’च्या सागरी चाचण्या यशस्वी पार पडल्या आहेत. ‘आयएनएस अरिहंत’च्या तुलनेत ‘आयएनएस अरिघात’ अधिक प्रमाणात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असेल. या पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

'आयएनएस अरिघात'

भारतीय नौदल २४ पाणबुड्यांची बांधणी करणार असून यात सहा आण्विक पाणबुड्या आहेत. भारतीय नौदलाच्या ‘ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल प्रोजेक्ट’ (एटीव्ही) अंतर्गत विशाखापट्टणममध्ये ‘आयएनएस अरिघात’ची उभारणी करण्यात आली. ‘आयएनएस अरिहंत’नंतर अरिहंत श्रेणीतील स्वदेशी बनावटीची ही दुसरी आण्विक पाणबुडी आहे. ‘आयएनएस अरिघातमध्ये ‘के-१५ सागरिका’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७५० ते ३,५०० किलोमीटरपर्यंत आहे. सदर पाणबुडी किमान १२ के-१५ क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. पण आवश्यकतेनुसार क्षेपणास्त्रांची संख्या कमी करुन सदर पाणबुडीत के-४ श्रेणीतील लांब पल्ल्याची चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रेही तैनात केली जाऊ शकतात.

समुद्राच्या लाटांबरोबर प्रवास करताना या पाणबुडीचा वेग १२ ते १५ नॉटिकल मैल (२२ ते २८ किमी प्रति तास) इतका आहे. तर ३०० मीटर खाली पाण्याची पातळी गाठल्यानंतर सदर पाणबुडी २४ नॉटिकल मैल (४८ किमी प्रति तास) इतक्या वेगाने प्रवास करते. २०१७ साली ‘आयएनएस अरिघात’चे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर तीन वर्षे सागरी चाचण्या पार पडल्यानंतर आता तिचा नौदलात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हिंदी महासागरात चीनच्या हालचाली वाढत असताना या आण्विक पाणबुडीचा नौदलातील समावेश महत्त्वाची घडामोड ठरते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारत स्टेल्थ पाणबुड्यांची निर्मिती करणार असल्याचे नौदलाने जाहीर केले होते. सुमारे ४२ हजार कोटी रुपयांच्या सहा स्टेल्थ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी निविदा काढणार असल्याचे नौदलाने स्पष्ट केले होते.

leave a reply