देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत देशात आणखी ५६ हजारांहून नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी बुधवारी चोवीस तासात ५६ हजार २८२ नवे रुग्ण आढळले होते. तसेच एका दिवसात ९०४ जणांचा बळी गेला होता. गुरुवारीही देशभरात या साथींच्या बळींची संख्या ८०० पुढे गेल्याचे राज्यांकडून जाहीर माहितीनुसार स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातच चोवीस तासात ३१६ जण दगावले असून ११५१४ नवे रुग्ण आढळले आहेत.

Corona-Indiaदेशात एका दिवसात ६ लाख ६७ हजार कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. देशात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. जानेवारीमध्ये देशात कोरोनाची चाचणी घेण्यासाठी एकच लॅब होती. गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देशातील १३७० व्या लॅबचे उद्घाटन केले. देशात आता नागरिकांना किमान तीन तासावर एक तरी लॅब सध्या उपलब्ध झाल्याचे हर्ष वर्धन म्हणाले. देशात कोरोनाने बरे होण्याचा दरही ६७.६२ वर पोहोचला असून या साथीमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर २.०७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

या दिलासादायक बातम्या येत असताना कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या सतत चिंता वाढवत आहे. गुरुवारी भारतात आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली. महाराष्ट्रात एका दिवसात ११५१४ नवे रुग्ण आढळले. आंध्र प्रदेशात चोवीस तासात ७२ जणांचा बळी गेला आणि १०३२८ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत ११० कोरोना रुग्ण दिवसभरात दगावले आणि ५६८४ नव्या रुग्णांची भर पडली. कर्नाटकात ९२ जणांचा मृत्यू झाला. तसेच ६५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. बिहारमध्येही एका दिवसात तीन हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत १३०० नवे रुग्ण आढळले.

दरम्यान देशात ३० जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तर १६ जुलैला देशातील कोरोनाची रुग्ण संख्या १० लाखांच्या पुढे गेली होती. देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचण्यास १६८ दिवस लागले होते. तर केवळ २१ दिवसात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० लाखांवरून २० लाखांवर पोहोचली आहे.

leave a reply