देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८ लाखांवर

दरदिवशी २० टक्के कोरोना रुग्ण भारतात आढळत आहेत

नवी दिल्ली – चार दिवसात देशात दोन लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८ लाखांवर गेली आहे. जगभरात सध्या अडीच लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण एका दिवसात नोंदविले जात आहे. गेल्या पाच दिवसातील भारतात नोंद होत असलेल्या नव्या रुग्णांची संख्या पाहता, जगभरात एका दिवसात आढळत असलेल्या रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण भारतातच नोंदविले जात आहेत. ही गोष्ट चिंता वाढविणारी ठरते. मात्र देशात या साथीच्या रुग्णांचा बरे होण्याच्या दरही सतत सुधारत असून आतापर्यंत देशातील सुमारे ११.५ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. ही दिलासादायक बाब ठरते.

Corona-Indiaशनिवारी देशात कोरोनाचे ५४४३५ नवे रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी ५७ हजार रुग्णांची एका दिवसात नोंद झाली होती. यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७ लाख ५० हजारांच्या पुढे पोहोचली होती. रविवारी रात्रीपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेली माहिती पाहता देशात सुमारे ५० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १८ लाखांवर गेली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे.

महाराष्ट्रामध्ये रविवारी २६० जण या साथीने दगावले आणि ९,५०९ नवे रूग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दरदिवशी सुमारे १० हजारने वाढत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत नोंद झालेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४ लाख ४१ हजारावर पोहोचली आहे. तसेच राज्यातील बळींची संख्या १५,५७६ वर गेली आहे.

महाराष्ट्रानंतर एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आंध्रप्रदेशात आढळत असून रविवारी या राज्यात ६७ जणांचा बळी गेला आणि ८,५५५ नवे रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू मध्ये  ९८ जण दगावले तर ५,८७५ नव्या रूग्णांची नोंद झाली. कर्नाटकात चोवीस तासात या कोरोनाचे ५५३२ नवे रुग्ण आढळले. पश्चिम बंगाल मध्ये २,७३९ नवे रूग्ण आढळले आहेत, तर ४९ जण दगावले आहेत. उत्तरप्रदेशात सुमारे ३८०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बिहारमध्ये २७६२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

leave a reply