भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा लाखांवर पोहोचली आहे. केवळ पाच दिवसात देशात सुमारे एक लाख रुग्ण वाढले आहेत. बुधवारी महाराष्ट्रात १९२ जणांचा बळी गेला आणि साडे पाच हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाच्या बळींची संख्या आठ हजारांवर आणि रुग्णांची संख्या १ लाख ८० हजारांवर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभरात ५७ जणांचा बळी गेला आणि ८३३ नवे रुग्ण आढळले. मुंबईतील कोरोनाचे संक्रमण पाहता मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना महत्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Corona-Indiaदेशात मंगळवारपासून बुधवारच्या सकाळपर्यंत तब्बल ५०७ जणांचा बळी गेला. यामुळे देशातील या साथीने दगावलेल्यांची संख्या १७४०० वर पोहोचली. तसेच चोवीस तासात १८,६५३ नवे रुग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या ५,८५,४९३ वर गेली. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०० वरून लाखावर पोहोचण्यास ६४ दिवस लागले होते. तर लाखाहून दोन लाख होण्यासाठी पंधरादिवस, तीन लाखांवर पोहोचण्यासाठी आणखी दहा दिवस लागले होते. तर तीन लाखांवरून चार लाख रुग्ण संख्या होण्यास आठ दिवस आणि चार लाखांवरून पाच लाख होण्यास अवघे सहा दिवस लागले. गेल्या आठवडाभरापासून १८ ते २० हजार नव्या रुग्णांची नोंद दरदिवशी होत असून यामुळे अवघ्या पाच दिवसात देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या पाच लाखांवरून सहा लाखांवर पोहोचली आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत राज्यांनी दिवसभरात सापडलेल्या रुग्णांची जाहीर केलेली माहिती पाहता देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहा लाखांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातच साडे पाच हजार नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबई शेजारी मीरा भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता स्थानिक प्रशासनाने १० दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूत आढळले आहेत. येथे चोवीस तासात ६३ जण दगावले आणि ३,८८४ नवे रुग्ण सापडले. दिल्ली २४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात १२७२ नवे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये २१ जणांचा बळी गेला आणि ६७५ नवे रुग्ण सापडले.

leave a reply