देशातील कोरोना रुग्णसंख्या ५१ लाखांच्या पुढे

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५१ लाखांच्या पुढे गेली आहे, तर या साथीने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८३ हजारांवर पोहोचली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात ३९८ जणांचा मृत्यू झाला, तसेच २४ हजार ३९८ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ४३ जण दगावले असून २ हजार ३३९ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

५१ लाखांच्या पुढे

गेल्या तीन दिवसांपासून देशात ८० ते ८३ हजार नव्या रूग्णांची नोंद होत होती. मात्र बुधवारी ९७,८८४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. तसेच गुरुवारीही देशभरात तितकेच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात चोवीस तासात ९३ जणांचा बळी गेला व ९३६६ नवे रुग्ण सापडले. आंध्र प्रदेशात ७२ जणांचा मृत्यू झाला, तसेच ८७०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत एका दिवसात ५९ जणांचा बळी गेला असून ५,५६० नवे रुग्ण आढळले. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ६० जण दगावले आणि ३१९७ नवे रुग्ण आढळले, दिल्लीत ३८ जणांचा मृत्यू झाला, तर ४४३२ नव्या रुग्णाची नोंद झाली.

दरम्यान देशात एका दिवसात ११ लाख ३६ हजाराहून अधिक कोरोनाच्या चाचण्या पार पडल्या असून यामुळे देशातील आतापर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या ६ कोटीच्या पुढे गेली आहे.

leave a reply