भारताच्या निर्यातबंदी नंतर बांगलादेश आणि नेपाळमध्ये कांद्याचे भाव कडाडले

काठमांडू/ढाका – भारताने कांद्याच्या निर्यातीवर आकस्मिक बंदी घातल्यानंतर शेजारी देश नेपाळ आणि बांगलादेशमध्ये कांद्याचे दर कडाडले आहेत. बांगलादेशात काही दिवसांपूर्वी ३० ते ५० टका प्रतिकिलो विकला जाणारा कांदा १२० टका पर्यंत पोहोचला आहे. तर नेपाळच्या काठमांडूमधल्या घाऊक बाजारात कांद्याच्या किंमती ७०-८० रूपये झाल्या असून किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात प्रतिकिलो १५० रूपये वाढ झाली आहे. भारताने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयावर बांगलादेशने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. दक्षिण भारतात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाला बसलेला फटका हे देखील प्रमुख कारण सांगितले जात आहे.

दक्षिण आशियाई देशांमध्ये भारत हा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मलेशिया हे देश भारताकडून कांद्याची आयात करतात. पण भारताने घेतलेल्या या निर्णयाचा फटका या देशांना बसला आहे.

विशेष करून नेपाळ आणि बांगलादेशातील बाजारपेठेत कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. बांगलादेशात कांद्याचे भाव १२० टका पर्यंत पोहोचले आहेत तर नेपाळमध्ये कांद्याची किरकोळ किंमत १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. या देशांमध्ये कांद्याचा काळाबाजार करण्यास सुरवात झाली असून आगामी काळात कांद्याच्या किंमतीत आणखीन वाढ होईल, असा दावा केला जात आहे.

बांगलादेशात कांद्याची वार्षिक मागणी २५ लाख टन आहे आणि गेल्या वर्षी देशाचे उत्पादन २५.५७ लाख टन होते. पण काही कांदा खराब झाल्यामुळे तूट भरून काढण्यासाठी बांगलादेशने भारताकडे कांद्याची मागणी केली होती. पण कोणतीही सूचना न देता बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल बांगलादेश सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका स्थित भारतीय उच्चायुक्तालयाला पत्र पाठविले आहे. या पत्रात कांदा निर्यात बंदी संदर्भात घेतलेल्या अचानक निर्णयामुळे दोन्ही देशांमध्ये याधीही परस्पर देवाणघेवाणबाबत कटुता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

तसेच ढाकामध्ये १५-१६ जानेवारी २०२० रोजी दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्रालयातील सचिव-स्तरीय बैठकीत बांगलादेशने आवश्यक खाद्य वस्तूंवर निर्यात बंदी लागू न करण्याची विनंती केली होती. त्यावेळी अशा प्रकारची बंदी घालण्याची वेळ ओढावली तर काही दिवस आधी बांगलादेशला सूचना देण्याची विनंती करण्यात आली होती, याची आठवण या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी मागे घेण्याची विनंती केली असून लवकरच त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एम.शहरियार आलम यांनी व्यक्त केली आहे.

leave a reply