‘ओपन स्काईज् ट्रिटी’तून माघारीसाठी रशियन संसदेत विधेयक सादर

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगातील ३४ देशांचा समावेश असणार्‍या ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधून बाहेर पडण्यासाठी मंगळवारी संसदेत विधेयक दाखल केले. अमेरिकेच्या माघारीमुळे करारात सहभागी असलेल्या सदस्य देशांच्या हितसंबंधांचा समतोल बिघडल्याची टीका यावेळी पुतिन यांनी केली. गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधून माघारीची घोषणा केली होती.

‘ओपन स्काईज् ट्रिटी’तून माघारीसाठी रशियन संसदेत विधेयक सादर१९९२ साली हेलन्स्की येथे झालेल्या बैठकीत ‘ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी ऍण्ड कोऑपरेशन इन युरोप’ (ओएससीई) या गटाच्या सदस्य देशांनी ‘ओपन स्काईज् ट्रिटी’ला मंजुरी दिली होती. अमेरीका व रशियासह युरोपिय देशांचा सहभाग असलेला या करारानुसार, सदस्य देशांना परस्परांच्या हवाईहद्दीत विमाने धाडून संवेदनशील ठिकाणंची टेहळणी करण्याची परवानगी आहे. यासाठी टेहळणी विमानाचा तसेच ड्रोन्सचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

रशिया सदर कराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अमेरिका गेल्या काही वर्षांपासून करीत होती. करारातील नियमांचा विपर्यास करून रशिया इतर देशांच्या हवाईहद्दीत प्रवेश करीत असल्याची तक्रार अमेरिकेने केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने या करारातून अधिकृतरित्या पूर्ण माघार घेतल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेच्या माघारीनंतर यावर्षी जानेवारी महिन्यात रशियानेही या करारातून माघारीची घोषणा केली होती.

‘ओपन स्काईज् ट्रिटी’तून माघारीसाठी रशियन संसदेत विधेयक सादरअमेरिका व रशिया या दोन्ही देशांच्या माघारीवर युरोपिय देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रशियाने या मुद्यावर युरोपिय देशांना स्वतंत्र प्रस्तावही दिला होता. मात्र युरोपिय देशांनी तो नाकारला होता. त्यामुळे रशियाची माघार निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सादर केलेल्या विधेयकाने त्याला दुजोरा मिळाला आहे.

पुतिन यांनी सादर केलेल्या विधेयकात, अमेरिकेच्या माघारीने समतोल बिघडल्याचा आरोप करण्यात आला असून त्याने रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच रशिया ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मध्ये राहणे शक्य नसून त्यातून बाहेर पडत असल्याचे विधेयकात स्पष्ट करण्यात आले. या विधेयकावर रशियन संसदेत मतदान होणार असून या महिन्याच्या अखेरपर्यंत ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, अशी माहिती रशियन अधिकार्‍यांनी दिली. रशिया आणि पाश्‍चात्य देशांमध्ये विविध मुद्यांवरील तणाव वाढत असताना रशियाच्या ‘ओपन स्काईज् ट्रिटी’मधील माघारी लक्ष वेधून घेणारी घटना ठरत आहे.

leave a reply