कोरोनाच्या संकटात केरळमध्ये झिकानंतर आता ‘निपाह’चा उद्रेक

  • १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
  • केरळमधील आरोग्य यंत्रणा हायऍलर्टवर

‘निपाह’थिरुवनंतपूरम/कोझिकोड – देशात कोरोनाच्या साथीचा सध्या केंद्रबिंदू बनलेल्या केरळात नव्या साथीच्या आपत्तीने दार ठोठावले आहे. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे एका १२ वर्षिय मुलाचा बळी गेला आहे, तसेच निपाहचे आणखी दोन संशयित रुग्णही आढळले आहेत. दीड महिन्यांपूर्वीच केरळमध्ये झिका विषाणूचा उद्रेक झाला होता. झिका साथ नियंत्रणात आली असल्याचे काही दिवसांपूर्वीच केरळने जाहीर केले होते. त्यानंतर आता निपाहच्या उद्रेकाने केरळच्या आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढविला आहे.

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका गावात निपाहचा रुग्ण आढळला आहे. या मुलाला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. या मुलामध्ये इन्फेफलायटिसच्या साथीची लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चाचणीमध्ये त्याला निपाह विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी या मुलाचा मृत्यू झाला.

‘निपाह’यानंतर गेल्या १२ दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. सुमारे २० जण संशयित आहेत. तर निपाहची लक्षणे असलेली दोन संशयित रुग्णांना विलिगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याआधी केरळमध्ये २०१८ आणि २०१९ सलात निपाह विषाणूचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यावेळी आखाती देशांनीही केरळमधून होणारी आयात थांबविली होती. निपाह विषाणू फ्रूट बॅट या प्रकारातील वटवाघळांच्या लाळेमार्फत पसरतो. या प्रजातीतील वटवाघळांचा वावर असलेल्या झाडांवरील फळे खल्ल्याने या विषाणूची लागण होते. केरळात निपाह विषाणूचा फैलाव हा सध्यातरी एका ठरावीक भागापुरताच मार्यादीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन वर्षांपूर्वी कोझिकोड आणि मलाप्पूरममध्ये निपाहचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या दोन जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष पुरविण्याच्या सूचना केरळच्या आरोग्य विभागाला केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य पथकही केरळात दाखल झाले आहे. सध्या केरळमध्ये कोरोनाची असलेली स्थिती पाहता निपाहचा रुग्ण आढळणे जास्त चिंतेचा विषय ठरत आहे. देेशात दरदिवशी आढळणार्‍या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे केरळमध्ये आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला ३० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. केरळमधील कोरोनाची स्थिती मोठ्या चिंतेचा विषय बनली आहे. येथे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता केरळच्या आरोग्य यंत्रणेला निपाहच्या आव्हानाशी सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, तमिळनाडूने केरळला लागून असलेल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये तपासणी वाढविली आहे. केरळमधून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे.

leave a reply